दोन गटांना दोन नावे,दोन चिन्हे; तृणमूल काँग्रेसमधील वादाबाबत निवडणूक आयोगाचा फैसला, ‘लोकशाहीतील काळा दिवस’ (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

दोन गटांना दोन नावे,दोन चिन्हे; तृणमूल काँग्रेसमधील वादाबाबत निवडणूक आयोगाचा फैसला, ‘लोकशाहीतील काळा दिवस’

पश्चिम बंगालमधील दोन विधानसभा मतदारसंघांत ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही प्रतिस्पर्धी गटांना नवीन नावे आणि निवडणूक चिन्हे वाटप केली आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दोन विधानसभा मतदारसंघांत ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही प्रतिस्पर्धी गटांना नवीन नावे आणि निवडणूक चिन्हे वाटप केली आहेत.

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाला 'ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस', तर अरुप रॉय यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाला 'डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस' हे नाव देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, ममता बॅनर्जी यांच्या गटाला 'फुटबॉलपटू' हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे, तर अरुप रॉय यांच्या गटाला 'लिफाफा' हे चिन्ह देण्यात आले आहे.

गुरुवारी रात्री जारी केलेल्या अंतरिम आदेशात निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना 'ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस' हे नाव आणि पक्षाचे मूळ चिन्ह गवतावर दोन फुले हे वापरण्यास मनाई केली होती. आयोगाने दोन्ही बाजूंना शुक्रवारी सकाळपर्यंत त्यांच्या पसंतीची नावे आणि चिन्हांचे पर्याय सादर करण्याचे निर्देश दिले होते. निवडणूक चिन्हे (आरक्षण आणि वाटप) आदेश, १९६८ च्या परिच्छेद १५ अंतर्गत पक्षाच्या मूळ नावावर आणि चिन्हावर दावा सांगणाऱ्या वादाची संपूर्ण सुनावणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध नव्हता. त्यामुळे आगामी पोटनिवडणुकीची तातडी लक्षात घेऊन आयोगाने ही तात्पुरती व्यवस्था केली आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत ही व्यवस्था लागू राहील.

पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी ६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झाली होती. पक्षाच्या २८ वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच फूट मानली जात आहे. ५८ बंडखोर आमदारांनी ममता कॅम्पचे उमेदवार सोवनदेब चटोपाध्याय यांच्याऐवजी पक्षातून हकालपट्टी झालेले नेते ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली होती. यानंतर काकोली घोष दस्तैदार यांच्या नेतृत्वाखालील २० खासदारांनी भाजपप्रणीत एनडीएला पाठिंबा जाहीर केला.

आता पक्षचोरी – राहुल

नवी दिल्ली : "आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस... भाजप आणि निवडणूक आयोग मिळून पक्ष फोडत आहेत. आधी मतचोरी झाली, नंतर सरकारचोरी झाली आणि आता पक्षचोरी सुरू आहे," असा घणाघाती आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.

ममतांनी पाठिंबा देताच उमेदवाराला अटक

कोलकाता : नंदीग्राम विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना २००७ मधील जमीन संपादनविरोधी आंदोलनाशी संबंधित एका प्रकरणात शुक्रवारी अटक करण्यात आल्याचा दावा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी प्रधान यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.२००७ च्या नंदीग्राम आंदोलनाशी संबंधित १२ हून अधिक प्रकरणांमध्ये प्रधान यांचे नाव दाखल आहे. काँग्रेस नेत्यांनी या अटकेवर तीव्र संताप व्यक्त करत म्हटले, "हा भाजपचा राजकीय डाव आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ऑस्कर स्पर्धेत मराठीचा ‘गोंधळ’; भारतातर्फे अधिकृत प्रवेशिकेसाठी निवड

मराठा आरक्षण याचिका नव्या पूर्णपीठासमोर; न्यायमूर्ती कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपीठ, ९ ऑक्टोबरपासून होणार नव्याने सुनावणी

भाईंदर भूखंड फेरफार प्रकरण : गुन्हा दाखल करण्याची मागणी; पंतप्रधानांच्या बालमित्राची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार

महाशक्तीचे महागडे युद्धबिल कोण भरणार?

मानवी प्रज्ञेची कृत्रिमता!