नवीन आर्थिक वर्ष म्हणजेच आर्थिक वर्ष २०२५-२६ (FY26) उद्या, १ एप्रिलपासून सुरू होत आहे. या नव्या आर्थिक वर्षासोबतच अनेक महत्त्वाचे आर्थिक बदल लागू होत आहेत, ज्यांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होऊ शकतो.
या वर्षीचा सर्वात मोठा बदल म्हणजे नवीन कर प्रणाली. नव्या कर प्रणालीत १२ लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. यामुळे नव्या करप्रणालीचा पर्याय निवडणाऱ्या करदात्यांना प्राप्तिकरात सवलत मिळेल आणि ही बाब मोठा दिलासा ठरणार आहे.
नवीन कर स्लॅब पुढीलप्रमाणे:
₹४ लाखपर्यंत : कोणताही कर नाही
₹४ लाख ते ₹८ लाख : ५% कर
₹८ लाख ते ₹१२ लाख : १०% कर
₹१२ लाख ते ₹१६ लाख : १५% कर
₹१६ लाख ते ₹२० लाख : २०% कर
₹२० लाख ते ₹२४ लाख : २५% कर
₹२४ लाखांपेक्षा जास्त : ३०% कर
बघा जुन्या आणि नवीन कर प्रणालीतील फरक
UPI व्यवहार नियमांत बदल:
१ एप्रिलपासून UPI व्यवहारांबाबतही नवे नियम लागू होणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सुरक्षितता वाढवण्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सक्रिय नसलेल्या (inactive) मोबाईल नंबरवरून UPI व्यवहार करता येणार नाहीत. Gpay, PhonePe यांसारख्या अॅप्सना असे क्रमांक हळूहळू यंत्रणेतून वगळण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून ते इतर वापरकर्त्यांना पुन्हा देते येणे शक्य होईल.
GST नियम:
FY26 पासून GST पोर्टलवर मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन (MFA) अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, उद्योगांसाठी ई-वे बिल (EWB) ६ महिन्यांपेक्षा किंवा १८० दिवसांपेक्षा जुने नसलेले दस्तावेज वापरूनच तयार करता येणार आहेत. थोडक्यात ई-वे बिल इनवॉइसच्या तारखेपासून १८० दिवसांत एक्सपायर होणार आहे. गेल्या वर्षीच्या ई-बिलचा वापर करता येणार नाही.
पेन्शनचे नियम
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी १ एप्रिल २०२५ पासून यूनिफाइड पेन्शन स्कीम लागू केली जाणार आहे. किमान २५ वर्षांच्या सेवेच्या अधीन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीपूर्वीच्या १२ महिन्यांत मिळालेल्या सरासरी मूळ पगाराच्या ५० टक्के रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे. यूपीएस आणि एनपीएस यापैकी एक निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना मिळेल.
क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल:
नवीन आर्थिक वर्षासोबतच एसबीआय, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि अॅक्सिस बँक यांसह अनेक बँका त्यांच्या क्रेडिट कार्ड धोरणांमध्ये बदल करणार आहेत. या बदलांमुळे शुल्क, रिवॉर्ड्स आणि विविध सुविधांवर थेट परिणाम होणार आहे.
एसबीआय क्रेडिट कार्ड (SBI Credit Cards) :
एसबीआय कार्डच्या काही व्यवहारांवरील रिवॉर्ड पॉइंट्समध्ये कपात करण्यात येणार आहे. SimplyCLICK SBI कार्डधारकांना आता Swiggy वर केवळ ५ पट रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील, जे यापूर्वी १० पट होते. तथापि, Myntra, BookMyShow आणि Apollo 24 यांसारख्या इतर भागीदार ब्रँड्सवर १० पट रिवॉर्ड्सची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.
एसबीआय एअर इंडिया कार्ड्स (SBI Air India Cards) :
एअर इंडिया एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांच्या रिवॉर्ड्समध्ये लक्षणीय कपात करण्यात येणार आहे. Air India SBI Platinum क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना आता Air India च्या तिकीट बुकिंगवर प्रति ₹१०० खर्चावर ५ रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील, जे यापूर्वी १५ पॉइंट्स होते. तसेच, Air India SBI Signature क्रेडिट कार्डधारकांना प्रति ₹१०० खर्चावर आता १० रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील, जे यापूर्वी ३० पॉइंट्स होते.
एक्सिस बँख विस्तारा क्रेडिट कार्ड (Axis Bank Vistara Credit Card) :
एअर इंडियासोबतच्या विस्तारा विलीनीकरणानंतर, अॅक्सिस बँक त्यांच्या विस्तारा क्रेडिट कार्डच्या सुविधांमध्ये अनेक बदल करत आहे. १८ एप्रिल २०२५ पासून किंवा त्यानंतर आपले कार्ड नूतनीकरण करणाऱ्या कार्डधारकांकडून वार्षिक शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, यासोबत काही मौल्यवान सुविधा बंद केल्या जात आहेत. त्यात मुफ्त महाराजा क्लब टियर सदस्यत्वाची सुविधा बंद केली जाणार आहे, जी याआधी कार्डसोबत देण्यात येत होती.
आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड (IDFC First Bank Credit Card) :
३१ मार्चपासून IDFC फर्स्ट बँक आपल्या Club Vistara क्रेडिट कार्डसाठी माइलस्टोन रिवॉर्ड्स बंद करणार आहे. ग्राहकांना तोपर्यंत महाराजा पॉइंट्स मिळत राहतील, परंतु हे कार्ड टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. या बदलांचा अर्थ लवकरच Vistara Silver सदस्यत्वही उपलब्ध राहणार नाही आणि प्रीमियम इकॉनॉमी तिकीट व क्लास अपग्रेडसह इतर कॉम्प्लिमेंटरी व्हाउचर्स देखील बंद केले जातील. ३१ मार्च २०२५ नंतर कार्डचे नूतनीकरण करणाऱ्या ग्राहकांना एक वर्षासाठी वार्षिक शुल्क माफ करण्यात येईल. तथापि, प्रवासाविषयक महत्त्वाच्या सुविधा आणि Vistara संदर्भातील लाभ रद्द करण्यात आले आहेत.