Fire at 'Baby Care New Born Hospital' X / ANI
राष्ट्रीय

दिल्लीतील बाल रुग्णालयात आग; ६ अर्भकांचा मृत्यू, ५ जणांना वाचवण्यात यश

दिल्लीतील विवेक विहार भागात असलेल्या एका बाल रुग्णालयाला शनिवारी रात्री लागलेल्या आगीत ६ अर्भकांचा मृत्यू झाला असून ५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीतील विवेक विहार भागात असलेल्या एका बाल रुग्णालयाला शनिवारी रात्री लागलेल्या आगीत ६ अर्भकांचा मृत्यू झाला असून ५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. रुग्णालयाच्या दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नवजात बालकांचे सेंटर होते. यात १२ लहान मुले होती.

दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही घटना घडली असावी, असे प्राथमिक तपासावरून आढळले आहे. या नवजात बालकांच्या सेंटरच्या तळमजल्यावर अवैधरीत्या ऑक्सिजन सिलिंडर भरण्याचे काम सुरू होते. दिल्ली पोलिसांनी या बाल रुग्णालयाचे मालक नवीन खिची याच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले असून त्याला अटक केली आहे.

अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची सूचना आम्हाला मिळाली. अग्निशमन दलाचे १६ बंब घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आग इमारतीच्या दोन्ही मजल्यांपर्यंत पोहचली होती. या सेंटरमध्ये जाण्यासाठी एकच जिना होता. तेथेही आग पसरली होती.

श्वास कोंडल्याने मुलांचा मृत्यू

बेबी केअर सेंटरमध्ये दाखल १२ पैकी एका शिशूचा मृत्यू आग लागण्यापूर्वीच झाला होता, तर रुग्णालयात धूर पसरल्याने ११ मुलांची परिस्थिती गंभीर बनली. अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी खिडकीतून ११ मुलांना बाहेर काढले. मात्र, त्यातील ६ मुलांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी या बालकांचे मृतदेह जीटीबी रुग्णालयात पाठवले आहेत.

या दुर्घटनेतून वाचलेल्या पाच मुलांना आधुनिक एनआयसीयू रुग्णालयात दाखल केले आहे. अग्निशमन दलाने दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक

कल्याणमध्ये ३० वर्षांपासून राहणाऱ्या नेपाळी महिलेचा पर्दाफाश; भारतीय कागदपत्रांसह मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात