महिला अधिकाऱ्यांची पहिली तुकडी लष्करात; 'आयएमए'च्या दीक्षांत संचलनाचे राष्ट्रपती यांच्याकडून निरीक्षण (Photo-X/@rashtrapatibhvn)
राष्ट्रीय

महिला अधिकाऱ्यांची पहिली तुकडी लष्करात; 'आयएमए'च्या दीक्षांत संचलनाचे राष्ट्रपती यांच्याकडून निरीक्षण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी येथील 'इंडियन मिलिटरी अकादमी' (आयएमए) मधील १५८ व्या नियमित अभ्यासक्रमाच्या आणि १४१ व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाचे निरीक्षण केले.

Swapnil S

डेहराडून : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी येथील 'इंडियन मिलिटरी अकादमी' (आयएमए) मधील १५८ व्या नियमित अभ्यासक्रमाच्या आणि १४१ व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाचे निरीक्षण केले. यावेळी भारतीय सैन्यात पहिल्यांदाच नऊ महिला अधिकारी कॅडेट्सचा समावेश करण्यात आला आहे.

या सोहळ्याला उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग (निवृत्त), मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, लष्करी प्रशिक्षण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा, इंडियन मिलिटरी अॅकॅडमीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल नागेंद्र सिंग, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि कॅडेट्सचे कुटुंबीय उपस्थित होते.

१६ मित्र देशांतील कॅडेट्सचाही समावेश

या संचलनानंतर नऊ महिला अधिकारी कॅडेट्ससह एकूण ५१५ अधिकारी कॅडेट्स भारतीय सैन्यात दाखल झाले. या पदवीधर गटामध्ये १६ मित्र देशांतील ३४ अधिकारी कॅडेट्सचाही समावेश होता, जे आपापल्या देशांच्या सशस्त्र दलात सामील होतील. या सोहळ्यादरम्यान उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक कॅडेट्सचा गौरव करण्यात आला. अकॅडमी कॅडेट अॅज्युटंट विशाल कुमार याला नियमित अभ्यासक्रमात प्रथम आल्याबद्दल 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' आणि सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. अकॅडमी अंडर ऑफिसर प्रिन्स राज याला रौप्य पदक, तर सीनियर अंडर ऑफिसर तेजस भट्ट याला कांस्य पदक मिळाले.

ऋषभ मिश्रा तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमात अव्वल

इतर अभ्यासक्रमांमध्ये, अधिकारी कॅडेट ऋषभ मिश्रा याने तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमात अव्वल स्थान पटकावून रौप्य पदक पटकावले. अधिकारी कॅडेट बोधराज थापा याने 'एससीओ' अभ्यासक्रमात, तर अधिकारी कॅडेट करण पांडे याने 'टीईएस' अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मिळवला. ज्युनिअर अंडर ऑफिसर झैफ सादिद अल्वी याला 'सर्वोत्कृष्ट परदेशी अधिकारी कॅडेट' चषक प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपतींनी कॅडेट्सचे केले अभिनंदन

या प्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी देशातील अत्यंत कठीण अशा प्रशिक्षण कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल कॅडेट्सचे अभिनंदन केले आणि त्यांचे शौर्य व सुज्ञपणा देशसेवेत त्यांचे मार्गदर्शन करेल. नऊ महिला कॅडेट्सच्या समावेशाबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांनी आयएमएच्या इतिहासातील हा एक 'महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी क्षण' असल्याचे सांगितले. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेने भारताच्या वाटचालीचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे, असेही त्या म्हणाल्या.

महिला अधिकाऱ्यांचा समावेश हा ऐतिहासिक क्षण

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला अधिकारी कॅडेट्सचा सैन्यात एकाचवेळी समावेश होणे हा या संस्थेसाठी अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे. कारण १९३२ मधील स्थापनेपासून या संस्थेने केवळ पुरुष लष्करी अधिकाऱ्यांच्या पिढ्यांना प्रशिक्षित केले आहे.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी