(Photo-X)
राष्ट्रीय

"सॉरी पप्पा! मला माफ करा" चिट्ठी लिहून तीन सख्ख्या बहिणींची आत्महत्या; पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर

काचेवर चिकटवलेल्या या चिठ्ठीत True Life Story असं लिहिलं असून त्यावर एक सॅड इमोजी काढलेला होता. त्यात लिहिलं होतं, "या डायरीमध्ये जे काही लिहिलं आहे, ते सर्व वाचा कारण...

किशोरी घायवट-उबाळे

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. निशिका (१६), प्राची (१४) आणि पाखी (१२) अशी मृत बहिणींची नावे असून त्यांनी सामूहिकरित्या टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासानुसार, ही घटना ऑनलाइन गेमिंग अ‍ॅपच्या व्यसनाशी संबंधित असल्याचे समोर आले असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

या तिन्ही बहिणींना ऑनलाइन कोरियन गेम खेळण्याची सवय होती. मंगळवारी (दि.३) या गेमचा शेवटचा टप्पा होता. या बहिणींनी शेवटचे टास्क पूर्ण करून ९ व्या मजल्यावरून उडी मारली, अशी माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास लोनी परिसरातील टीला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारत सिटी सोसायटीमधील नऊ मजली इमारतीत ही घटना घडली. तिन्ही बहिणी रात्री आपल्या खोलीतून बाहेर पडल्या, घरातील देवघराच्या खिडकीजवळ गेल्या आणि खिडकी उघडली. खिडकीजवळ ठेवलेल्या खुर्चीच्या सहाय्याने त्यांनी एकामागोमाग एक खाली उडी मारल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीनंतर या तिन्ही बहिणी शाळेत जात नव्हत्या. या घटनेनंतर पालकांना घरात एक चिठ्ठी आढळली. काचेवर चिकटवलेल्या या चिठ्ठीत True Life Story असं लिहिलं असून त्यावर एक सॅड इमोजी काढलेला होता. हिंदी-इंग्रजी अशा मिश्र भाषेत लिहिलेल्या चिठ्ठीत, "या डायरीमध्ये जे काही लिहिलं आहे, ते सर्व वाचा कारण हे सर्व खरं आहे. आताच वाचा! मला खरंच माफ करा. सॉरी पप्पा!"
असा मजकूर लिहिला आहे.

"या डायरीमध्ये जे काही लिहिलं आहे, ते सर्व वाचा कारण हे सर्व खरं आहे. आताच वाचा! मला खरंच माफ करा. सॉरी पप्पा!"

या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार सिंह यांनी सांगितले की, "पोलीस रिस्पॉन्स व्हेईकलला पहाटे २.१५ वाजता तीन मुलींनी नऊ मजल्यावरून उडी मारल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर निशिका, प्राची आणि पाखी या चेतन कुमार यांच्या मुली असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांना लोनी येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले."

दरम्यान, पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून चिठ्ठी, चिट्ठीत उल्लेख केलेली डायरी तसेच संबंधित ऑनलाइन गेमिंग अ‍ॅपशी निगडित डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. ऑनलाइन गेमिंगचा प्रभाव, कौटुंबिक परिस्थिती आणि मानसिक आरोग्य या सर्व बाबींचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

‘शक्तिपीठ’ चा खर्च १ लाख कोटी; महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार

मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही! प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती

तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदावर येणार होते गंडांतर; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणातील अंतर्गत बाब उघड

मोदींनी देश अमेरिकेला विकला! व्यापार करारावरून राहुल गांधी यांचा घणाघात

व्यापार करारात देशाचे हित अबाधित! केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांची माहिती