अलवार : भारत आणि चीनमध्ये जुलै २०२६ पासून अरुणाचल प्रदेशात अनेक चकमकी झाल्याचा गौप्यस्फोट इंडो-तिबेट बॉर्डर दलाचे (आयटीबीपी) महासंचालक शत्रूजीत सिंह कपूर यांनी केला आहे. ‘आयटीबीपी’च्या महासंचालकांनी सार्वजनिकरीत्या पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या सैन्यातील संघर्षाची कबुली दिल्याने विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
राजस्थानच्या अलवर येथील मध्यवर्ती प्रशिक्षण महाविद्यालयात हिमवीर सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. शत्रूजीत सिंह हे येत्या ३१ ऑक्टोबरला सेवेतून निवृत्त होणार आहेत. निवृत्तीला सात दिवस उरलेले असतानाच त्यांनी हे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. ते म्हणाले की, ‘जुलै अखेरीपासून अरुणाचल प्रदेशातील सुबनगिरी जिल्ह्यातील असफिला व माजा भागात तणाव निर्माण झाला आहे. भारताने या सीमेवर आपली लष्करी कुमक वाढवली आहे. गलवान संघर्षाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खास ‘ड्रोन फोर्स’ तेथे तैनात करणे गरजेचे आहे’.
सीमेवरील प्रत्येक बटालियनमध्ये ड्रोन तुकडी
‘आयटीबीपी’ने आपल्या सर्व सीमा सुरक्षा बटालियनमध्ये ड्रोन तुकडी उभारली आहे. ड्रोन पायलटना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे आधुनिक युद्धात सैनिक व इमारतींना थेट लक्ष्य केले जाऊ शकते. त्यामुळे भूयारी तुकड्या तयार केल्या जात आहेत. गलवानसारखी परिस्थिती उद्भवल्यास आधुनिक युद्ध कौशल्य व नवीन पद्धतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक बटालियनमध्ये शौर्य कमांडो पथक तयार केले जाणार आहे.
सीमेवर तैनाती ऐवजी दिल्लीत सुरक्षा दल तैनात - अभिजीत दीपके
चीनच्या सीमेवरील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, दिल्लीत आंदोलने रोखण्यासाठी सुरक्षा दल तैनात केले जात असल्याचा आरोप सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके यांनी शुक्रवारी केला.
सीमांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या सुरक्षा दलांचा वापर दिल्लीत आंदोलने रोखण्यासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भारत-चीन सीमेची सुरक्षा याला मोठे प्राधान्य नाही. मग प्राधान्य कशाला आहे? दिल्लीत कोणीही आंदोलन करू नये आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी कोणीही करू नये, याला,” असे दिपके म्हणाले.
नियंत्रण रेषेपासून ७ किमी अंतरावर चिनी छावण्या
असफिलासारख्या भागात चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून अवघ्या ६ ते ७ किमी अंतरावर आपल्या छावण्या उभारल्या आहेत. तसेच जुलैपासून दोन्ही देशांमध्ये तीन उच्चस्तरीय बैठका झाल्या आहेत. तरीही तणाव कायम आहे. ‘आयटीबीपी’च्या आधुनिकीकरणासाठी ४ हजार कोटी खर्च केले जातील. त्यात १ हजार कोटी ड्रोन व ॲँट्री ड्रोन यंत्रणेसाठी वापरले जातील. सध्या ४०० कोटींच्या योजनेतील ७० टक्के रक्कम ही ड्रोन क्षमता वाढवण्यासाठी केली जाईल, असे कपूर यांनी सांगितले.