'पॅक्स सिलिका'त भारताचा प्रवेश; AI व महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळी सुरळीत होणार  Photo : X
राष्ट्रीय

'पॅक्स सिलिका'त भारताचा प्रवेश; AI व महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळी सुरळीत होणार

अमेरिकेच्या भू-राजकीय व आर्थिक आघाडी असलेल्या ‘पॅक्स सिलिका’त भारताचा समावेश झाला आहे. सेमीकंडक्टर व एआयमध्ये चीनची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी राजनैतिक मार्गाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : अमेरिकेच्या भू-राजकीय व आर्थिक आघाडी असलेल्या ‘पॅक्स सिलिका’त भारताचा समावेश झाला आहे. सेमीकंडक्टर व एआयमध्ये चीनची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी राजनैतिक मार्गाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

‘एआय इम्पॅक्ट समिट’ दरम्यान झालेल्या समारंभात भारताने ‘पॅक्स सिलिका’मध्ये औपचारिक प्रवेशासाठी करारावर स्वाक्षरी केली. या कार्यक्रमाला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, अमेरिकेचे आर्थिक व्यवहारांचे अंडर सेक्रेटरी जेकब हेलबर्ग आणि भारताचे अमेरिकेतील राजदूत सर्जिओ गोर उपस्थित होते.

या आघाडीत भारताचे स्वागत करताना अमेरिकेचे आर्थिक व्यवहारांचे अंडर सेक्रेटरी जेकब हेलबर्ग यांनी सांगितले की, महत्त्वपूर्ण खनिजांच्या ‘अत्यंत एकवटलेल्या’ पुरवठा साखळ्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि ‘आर्थिक सक्ती व ब्लॅकमेलच्या’ धोक्यांकडे लक्ष वेधले. त्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नसले, तरी त्यांच्या टिप्पणी चीनच्या दुर्मिळ खनिजांवरील निर्यात नियंत्रणांकडे निर्देश करणाऱ्या असल्याचे स्पष्ट होते.

दुर्मिळ खनिजे इलेक्ट्रॉनिक्स, स्वच्छ ऊर्जा, हवाई क्षेत्र, वाहन आणि संरक्षण क्षेत्रांसह विविध उद्योगांसाठी अत्यावश्यक असून चीन या खनिजांच्या पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवतो.

भारताचे ‘पॅक्स सिलीका’त स्वागत करताना अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर म्हणाले की, भारतामुळे या आघाडीला बळकटी मिळेल. अमेरिका-भारत तंत्रज्ञान सहकार्य मजबूत करणारी धोरणे आगामी काळात एआय नवोन्मेष आणि त्याचा स्वीकार वाढवतील. आम्ही विश्वासार्ह एआय तंत्रज्ञान जगासोबत, विशेषतः भारतासारख्या भागीदारांसोबत वाटू शकतो. शांती ही प्रतिस्पर्धी न्याय्य वागतील या अपेक्षेवर अवलंबून नसते; ती सामर्थ्यावर आधारलेली असते. भारत हे समजतो. भारत मजबूत सीमांचे महत्त्व जाणतो. हीच ताकद ‘पॅक्स सिलिका’ अधिक व्यापक करते.’

आर्थिक व्यवहारांचे अंडर सेक्रेटरी जेकब हेलबर्ग म्हणाले, “दीर्घकाळ आपण आपल्या आर्थिक सुरक्षेच्या पायाकडे दुर्लक्ष केले. आज आपण अत्यंत एकवटलेल्या जागतिक पुरवठा साखळीशी झुंज देत आहोत. अमेरिका आणि भारत एआयसाठी नवोन्मेषाला प्रोत्साहन देणारा दृष्टिकोन स्वीकारत असून समृद्धीसाठी भक्कम पुरवठा साखळी उभारत आहेत. “आज ‘पॅक्स सिलिका’ घोषणापत्रावर स्वाक्षरी करताना, आम्ही शस्त्रीकरण झालेल्या अवलंबनाला आणि ब्लॅकमेलला नकार देतो. आर्थिक सुरक्षा म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सर्जिओ गोर यांनी सांगितले की, ‘पॅक्स सिलिका’ २१व्या शतकातील आर्थिक व तांत्रिक व्यवस्थेची दिशा ठरवेल आणि या उपक्रमात भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. भारताच्या अभियांत्रिकी क्षमतांबरोबरच महत्त्वपूर्ण खनिज प्रक्रिया क्षमतेत झालेल्या प्रगतीचाही त्यांनी उल्लेख केला.

भारत-अमेरिका सहकार्याच्या ‘अमर्याद शक्यता’ असल्याचे नमूद करताना गोर यांनी प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार कराराचाही उल्लेख केला. ‘अलीकडेच आम्ही अंतरिम व्यापार करार पूर्ण केला. हा करार केवळ व्यापार प्रवाहांबद्दल नव्हता, तर दोन मोठ्या लोकशाही एकत्र बांधणी करतील, केवळ एकमेकांकडून खरेदी करणार नाहीत, याबाबतचा संदेश होता,’ असे ते म्हणाले.

‘पॅक्स सिलिका’ला त्यांनी ‘क्षमतांची आघाडी’ असे संबोधले. जी सक्तीच्या अवलंबनांच्या जागी विश्वासार्ह औद्योगिक पायांवर आधारित सकारात्मक सहकार्य उभारते. नवोन्मेष बंगळुरू आणि सिलिकॉन व्हॅलीत होईल की लोकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या निरीक्षण राज्यांत हा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.

इस्रायल, जपान, सिंगापूरचा समावेश

या आघाडीतील सदस्य राष्ट्रांमध्ये ऑस्ट्रेलिया, ग्रीस, इस्रायल, जपान, कतार, दक्षिण कोरिया प्रजासत्ताक, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड किंगडम यांचा समावेश आहे. गोर यांनी गेल्या महिन्यात भारताला या धोरणात्मक आघाडीत सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले होते.

आपण भविष्य घडवत आहोत

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा क्षण केवळ औपचारिक स्वाक्षरीपुरता मर्यादित नाही. आपण फक्त एक शिखर परिषद घेत नाही आहोत; आपण भविष्य घडवत आहोत, असे त्यांनी म्हटले. भारताच्या वाढत्या सेमीकंडक्टर क्षमतांकडे लक्ष वेधताना ते म्हणाले, आज भारतातील कुशल अभियंते जगातील अत्याधुनिक दोन-नॅनोमीटर चिप्स डिझाइन करत आहेत. सेमीकंडक्टर उद्योगाला सुमारे दहा लाख नव्या कुशल मनुष्यबळाची गरज भासणार असून, ही भारतासाठी मोठी संधी आहे. भारताचा या आघाडीत प्रवेश हा दोन्ही देशांदरम्यान प्रस्तावित व्यापार करार अंतिम टप्प्यात नेण्याच्या आणि काही काळ तणावानंतर द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर झाला आहे.

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण! ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम, पुढील ४८ तास महत्त्वाचे

प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट; मुख्यमंत्र्यांची घोषणा

सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा ठराव केंद्राकडे का पाठवला नाही? सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला सवाल

Mumbai : प्रगत ‘पल्स्ड फिल्ड ॲब्लेशन’ तंत्रज्ञानाने यशस्वी उपचार; कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये नवा विक्रम

Mumbai : बेकायदा शाळांवर कारवाईचा बडगा; १११ अनधिकृत शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हे दाखल करा - राजेश्री शिरवडकर