प्रातिनिधिक छायाचित्र  
राष्ट्रीय

देशात 'ई-२०' इथेनॉलची विक्री १ एप्रिलपासून बंधनकारक; केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने येत्या १ एप्रिलपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रित (ई-२०) आणि किमान रिसर्च ऑक्टेन नंबर (आरओएन) ९५ असलेल्या पेट्रोलची विक्री बंधनकारक केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: केंद्र सरकारने येत्या १ एप्रिलपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रित (ई-२०) आणि किमान रिसर्च ऑक्टेन नंबर (आरओएन) ९५ असलेल्या पेट्रोलची विक्री बंधनकारक केली आहे.

तेल मंत्रालयाने १७ फेब्रुवारी रोजी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘केंद्र सरकार यानुसार निर्देश देते की, तेल कंपन्यांनी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस’च्या मानकांनुसार २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिश्रण असलेले आणि किमान ‘आरओएन ९५’ असलेले मोटार स्पिरिट (पेट्रोल) सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत विक्रीस ठेवावे.” विशेष परिस्थितीत, ठरावीक प्रदेशांसाठी आणि मर्यादित कालावधीसाठी केंद्र सरकार अपवाद मंजूर करू शकते.

इथेनॉल ऊस, मका किंवा धान्यापासून तयार होते. ते नवीकरणीय, देशांतर्गत उत्पादित असून शुद्ध पेट्रोलपेक्षा अधिक स्वच्छ जळते. तेल आयात कमी करण्यासह उत्सर्जन घटवण्यासाठी सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे ऊस, मका आणि कृषी अधिशेषाला मागणी वाढून शेतकऱ्यांनाही लाभ होतो.

उद्योग अधिकाऱ्यांच्या मते, २०२३–२०२५ दरम्यान व त्यानंतर भारतात तयार झालेली बहुतांश वाहने ‘ई-२०’ वर चालण्यासाठी डिझाइन केलेली असल्याने मोठ्या अडचणी अपेक्षित नाहीत.

तथापि, जुन्या वाहनांच्या मायलेजमध्ये ३ ते ७ टक्क्यांपर्यंत थोडी घट होऊ शकते. तसेच रबर/प्लास्टिक घटकांची झीज होण्याची शक्यता आहे. किमान ‘आरओएन ९५’ ची अट इंजिनचे नुकसान टाळण्यासाठी घालण्यात आली आहे.

आरओएन (रिसर्च ऑक्टेन नंबर) म्हणजे इंजिन नॉकिंग (पूर्व-प्रज्वलन) रोखण्याची इंधनाची क्षमता मोजणारा निर्देशांक. नॉकिंगमुळे इंजिनमध्ये इंधन असमान जळते, खटखट आवाज येतो, शक्ती कमी होते आणि कालांतराने इंजिनचे नुकसान होऊ शकते.

आरओएन जितका जास्त, तितकी नॉकिंगला प्रतिकारक्षमता अधिक असते. सोप्या शब्दांत, ऑक्टेन म्हणजे दाबाखाली इंधनाचे ‘स्वसंयम’. जास्त ‘आरओएन’ म्हणजे इंधन अधिक स्थिर राहते.

इथेनॉलचा ऑक्टेन मूल्य नैसर्गिकरित्या जास्त (सुमारे १०८ आरओएन) असतो. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळल्याने नॉकिंगविरोधी क्षमता वाढते.

जून २०२२ मध्ये पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य ठरलेल्या वेळेपेक्षा पाच महिने आधी साध्य झाल्यानंतर सरकारने २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट २०३० ऐवजी २०२५–२६ पर्यंत पुढे आणले. सध्या देशातील बहुतांश पंपांवर ‘ई-२०’ किंवा २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध आहे.

परकीय चलनात १.४० लाख कोटींची बचत

तेल मंत्रालयानुसार, २०१४–१५ पासून पेट्रोलच्या पर्यायामुळे भारताने परकीय चलनात १.४० लाख कोटी रुपयांहून अधिक बचत केली आहे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार