नेपाळला १५ हजार कोटींच्या मदतीचे पॅकेज; पंतप्रधान मोदी-बालेन शाह यांची आठ करारांवर स्वाक्षरी 
राष्ट्रीय

नेपाळला १५ हजार कोटींच्या मदतीचे पॅकेज; पंतप्रधान मोदी-बालेन शाह यांची आठ करारांवर स्वाक्षरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळसाठी २४ हजार कोटी नेपाळी रुपयांचे (१५ हजार कोटी भारतीय रुपये) पॅकेज जाहीर केले. तसेच नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्यासह भारत-नेपाळ प्रवासी रेल्वेसेवेचा प्रारंभ केला.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळसाठी २४ हजार कोटी नेपाळी रुपयांचे (१५ हजार कोटी भारतीय रुपये) पॅकेज जाहीर केले. तसेच नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्यासह भारत-नेपाळ प्रवासी रेल्वेसेवेचा प्रारंभ केला. दोन्ही देशांनी द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आठ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. सीमावादावरून काही काळ तणाव निर्माण झाल्यानंतर भारत-नेपाळ संबंधांना नव्याने दिशा देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न मानला जात आहे.

दोन्ही पंतप्रधानांच्या व्यापक चर्चेनंतर परराष्ट्र सचिवांना सीमावादाच्या प्रलंबित मुद्द्यावर काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी बालेन शाह यांनी भारत-नेपाळ संबंध हिमालयाप्रमाणे दृढ आणि महासागराप्रमाणे विशाल असल्याची भावना व्यक्त केली.

नेपाळमध्ये भारताच्या आर्थिक मदतीने उभारण्यात आलेल्या ऊर्जा आणि संपर्क क्षेत्रातील दोन प्रकल्पांचे दोन्ही नेत्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. तसेच अन्य तीन प्रकल्पांची पायाभरणी केली. याशिवाय विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य विस्तारण्यावर सहमती दोन्ही नेत्यांनी सहमती केली.

विकसित भारत आणि समुन्नत नेपाळ

भागीदारीची नवी संकल्पना याद्वारे आर्थिक सहकार्य, ऊर्जा, जलस्रोत, हवामान बदलाचा सामना, संपर्क व्यवस्था, तंत्रज्ञान आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांतील सहकार्याला नवी गती देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंधांचा नवा सुवर्ण अध्याय लिहिल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

मोदी यांनी नेपाळच्या विकास प्रवासाला भारताचा ठाम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, भारत नेपाळला २४ हजार कोटी नेपाळी रुपये (१५ हजार कोटी रुपये) विकास सहाय्य देणार आहे. यामध्ये भूकंपानंतरच्या पुनर्वसन आणि नव्या पायाभूत प्रकल्पांसाठी ५,६०० कोटी नेपाळी रुपये (३,५०० कोटी रुपये) अनुदान, तर ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांसाठी १८,४०० कोटी नेपाळी रुपये (११,५०० कोटी रुपये) कर्जसुविधेचा समावेश आहे.

ऑगस्टमध्ये नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल मोदी यांनी शोक व्यक्त केला. तसेच पुनर्बांधणी आणि दीर्घकालीन विकासासाठी २४ हजार कोटी नेपाळी रुपयांचे विकास सहकार्य पॅकेज जाहीर केले.

दोन्ही पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील अयोध्या आणि नेपाळमधील जनकपूर यांना जोडणाऱ्या ‘शरयू-कमला एक्सप्रेस’ रेल्वेसेवेचा दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ केला. या रेल्वेमुळे दोन्ही देशांमधील संपर्क वाढण्यासोबतच रामायण सर्किटमधील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. बौद्ध आणि शिव-शक्ती धार्मिक पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठीही अशाच संपर्क सुविधांचा शोध घेण्यावर सहमती झाली.

नेपाळमधील तरुण पिढी प्रतिभा, ऊर्जा आणि मोठ्या आकांक्षांनी परिपूर्ण असल्याचे मोदी म्हणाले. त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी भारत कटिबद्ध भागीदार म्हणून मदत करू इच्छितो, असे त्यांनी सांगितले.

परस्पर आदर, दृढ विश्वास आणि अखंड सद्भावना ही भारत-नेपाळ संबंधांची मूलभूत तत्त्वे आहेत. या अतुलनीय संबंधांच्या केंद्रस्थानी दोन्ही देशांचे नागरिक आहेत. भारत आणि नेपाळ यांचे संबंध हिमालयाप्रमाणे दृढ आणि महासागराप्रमाणे विशाल आहेत.
बालेन शाह, पंतप्रधान, नेपाळ
भारत आणि नेपाळ यांचे संबंध केवळ शेजारी देशांमधील संबंध नाहीत, तर खोलवर रुजलेल्या आपुलकीच्या भावना आणि दृढ विश्वास आहे. आमची आव्हानेही सारखीच असतात. एकमेकांच्या प्रगतीचे भागीदार आणि अडचणीच्या काळात परस्परांना आधार देणारे देश म्हणून आम्ही उभे आहोत.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही

अतिवेगाचे १३ बळी; राज्यात विविध अपघातांत २८ जखमी, १० गंभीर

अर्थव्यवस्थेची भरभराट, राहुलचा जळफळाट

आजचे राशिभविष्य, २४ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

थंडीच्या दिवसांत चहात तुळशीची पाने टाकताय? आधी हे वाचा! प्रत्येक तुळशीची चव नसते सारखी