भारत-अमेरिका व्यापार चर्चा लांबणीवर; ताज्या घडामोडींमुळे दोन्ही देशांचा निर्णय प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

भारत-अमेरिका व्यापार चर्चा लांबणीवर; ताज्या घडामोडींमुळे दोन्ही देशांचा निर्णय

भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार करारासाठी सोमवारपासून सुरू होणारी अधिकारी स्तरावरील प्रस्तावित चर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार करारासाठी सोमवारपासून सुरू होणारी अधिकारी स्तरावरील प्रस्तावित चर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भारतीय पथकाची तीन दिवसांची बैठक २३ फेब्रुवारीपासून अमेरिकेत होणार होती. वाणिज्य मंत्रालयातील संयुक्त सचिव दर्पण जैन यांना या करारावर चर्चा करण्यासाठी भारताकडून नियुक्त करण्यात आले आहे.

भारत-अमेरिका व्यापार करारासाठी भारतीय वाटाघाटी करणाऱ्या पथकाला अलीकडील घडामोडी आणि त्यांचे परिणाम या दोन्ही बाजूंचे मूल्यांकन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी दोन्ही बाजूंची भूमिका आहे. त्यामुळे भारतीय प्रमुख वाटाघाटीदार आणि पथकाचा प्रस्तावित दौरा परस्पर सोयीच्या तारखेला पुन्हा निश्चित केला जाईल, असे वाणिज्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. हा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महत्त्वाचा मानला जात आहे.

ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी आर्थिक अजेंड्यास मोठा धक्का देत अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने जगभरातील देशांवर लादलेले टॅरिफ बेकायदेशीर ठरवले. ‘आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायदा, १९७७’चा वापर करून हे टॅरिफ लावताना राष्ट्राध्यक्षांनी अधिकारांचा अतिरेक केल्याचे न्यायालयाने नमूद केले.

ऑगस्ट २०२५ मध्ये अमेरिकेने भारतावर २५ टक्के परस्पर शुल्क लादले होते. त्यानंतर रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल आणखी २५ टक्के शुल्क लावण्यात आले, ज्यामुळे भारतावरील एकूण शुल्क ५० टक्क्यांवर गेले. फेब्रुवारीच्या प्रारंभी दोन्ही देशांनी हंगामी व्यापार करार अंतिम करण्यासाठी एक चौकट मान्य केली होती. त्यानुसार अमेरिका भारतावरील शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी करणार होता. आतापर्यंत दंडात्मक २५ टक्के शुल्क काढून टाकण्यात आले असून उर्वरित २५ टक्के शुल्क कायम आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ट्रम्प यांनी टॅरिफ पुन्हा १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. हा अधिभार स्वरूपातील टॅरिफ लागू झाल्यास अमेरिकेतील विद्यमान आयात शुल्कांवर तो अतिरिक्त असेल.

भारतावरील शुल्काबाबत अनिश्चितता

अमेरिकेने भारतावर १५ टक्के टॅरिफ लावले आहे. हा कालावधी १५० दिवसांचा आहे. हा कालावधी संपल्यानंतर भारतासाठी अमेरिकेचे शुल्क १५ टक्के असेल की व्यापार करारात ठरवल्याप्रमाणे १८ टक्के राहणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये बंदूक घेऊन घुसणारा तरुण गोळीबारात ठार

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘मार-ए-लागो रिसॉर्ट’मध्ये बंदूक घेऊन घुसखोरी करणाऱ्या एका तरुणाला रविवारी ‘सिक्रेट सर्व्हिस एजंट्स’नी गोळ्या घालून ठार केले. राष्ट्राध्यक्षांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या ‘सिक्रेट सर्व्हिस’ने सांगितले की, एक तरुण सुरक्षा क्षेत्रात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्यावर एका गुप्तहेर एजंटने गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या तरुणाकडे बंदुकीसारखे शस्त्र आणि इंधनाचा डबा होता. तो २० वर्षांचा होता. घटनेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वॉशिंग्टन डीसी येथील व्हाइट हाऊसमध्ये होते. ते सहसा आठवड्याचे शेवटचे दिवस ‘मार-ए-लागो’ येथे घालवतात. मृताची ओळख अद्याप जाहीर झालेली नाही. तपास सुरू आहे.

ट्रम्प यांनी टॅरिफ १० टक्क्यांवरून १५ टक्के केले

ट्रम्प प्रशासनाने व्यापार भागीदारांवर लादलेल्या व्यापक आयात शुल्कांविरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. या निकालानंतर शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २४ फेब्रुवारीपासून १५० दिवसांसाठी भारतासह सर्व देशांवर १० टक्के शुल्क जाहीर केले होते. शनिवारी त्यांनी हे शुल्क १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली.

चहापानावर बहिष्कार! विरोधकांकडून मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी, अजित पवारांचा घातपात की अपघात? मविआचा सवाल, आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

अपघाताचे तथ्य बाहेर यावे हीच इच्छा - मुख्यमंत्री

देशाचे 'गलगोटिया'करण थांबलेच पाहिजे

आजचे राशिभविष्य, २३ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

बांधकाम प्रकल्पांमुळे ठाण्याची हवा प्रदूषित; २८ ठिकाणी नियमभंग, ५.२५ लाखांचा दंड