मोठा अनर्थ टळला! Indigo विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच पायलटने धोका ओळखला; इमर्जन्सी ब्रेक दाबला अन् २२९ प्रवासी वाचले (Photo-X)
राष्ट्रीय

मोठा अनर्थ टळला! Indigo विमान उड्डाणाच्या तयारीत असतानाच पायलटने धोका ओळखला; इमर्जन्सी ब्रेक दाबला अन् २२९ प्रवासी वाचले

एअरलाइनच्या अभियांत्रिकी पथकाने विमानाची सविस्तर तांत्रिक तपासणी केली. त्यानंतर विमानाला 'एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड' (AOG) घोषित करण्यात आले.

किशोरी घायवट-उबाळे

कर्नाटक : मंगळुरू विमानतळावर मोठी विमान दुर्घटना होता होता टळली. मंगळुरूहून बंगळुरूला जाणारे इंडिगोचे विमान टेकऑफसाठी धावपट्टीवर वेग घेत असतानाच वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा धोका लक्षात आला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तातडीने इमर्जन्सी ब्रेक लावत विमान थांबवले. सोमवारी (दि. १६) सायंकाळी सुमारे ६ वाजून ५ मिनिटांनी ही घटना घडली. विमानात २२९ प्रवासी आणि सात कर्मचारी असे एकूण २३६ जण होते. वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य दुर्घटना टळली असून, सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळुरू विमानतळावरून बंगळुरूच्या दिशेने जाणारे इंडिगोचे विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर वेगाने पुढे जात होते. विमानाने धावपट्टीचा बराचसा भाग पार केला असतानाच तांत्रिक बिघाड लक्षात आला. त्यानंतर वैमानिकांनी तातडीने 'रिजेक्टेड टेकऑफ' म्हणजेच उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला. विमान हवेत झेपावण्यापूर्वीच ही प्रक्रिया राबवण्यात आल्याने संभाव्य दुर्घटना टळली. काही वृत्तांमध्ये विमानाच्या डाव्या विंगजवळ आगीच्या ज्वाळा दिसल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, इंडिगोने अधिकृत निवेदनात तांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्ट केले आहे.

विमानाची तांत्रिक तपासणी सुरू

विमान थांबवल्यानंतर ते पुन्हा पार्किंग बेमध्ये आणण्यात आले. एअरलाइनच्या अभियांत्रिकी पथकाने विमानाची सविस्तर तांत्रिक तपासणी केली. त्यानंतर विमानाला 'एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड' (AOG) घोषित करण्यात आले. म्हणजेच आवश्यक दुरुस्ती आणि देखभाल पूर्ण होऊन परवानगी मिळेपर्यंत हे विमान उड्डाणासाठी वापरले जाणार नाही. विमानातील सर्व २२९ प्रवाशांना आणि सात कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. विमानतळ प्रशासन आणि एअरलाइनच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना मदत केली.

प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था

या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा पुढील प्रवास विस्कळीत झाला. त्यामुळे इंडिगोकडून पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. बंगळुरूहून मंगळुरूला पर्यायी विमान पाठवण्यात आले. मूळ विमानातील ३४ प्रवाशांनी या पर्यायी विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. हे विमान मंगळवारी (दि. १७) मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी मंगळुरूहून रवाना झाले.

जेवण, हॉटेल आणि तिकीट परताव्याचे पर्याय

प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी इंडिगोकडून जेवण आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. तसेच पर्यायी विमानसेवा, हॉटेलमध्ये राहण्याची सोय आणि तिकिटाचा पूर्ण परतावा असे पर्याय प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, एका प्रवाशाने एअरलाइनच्या पर्यायी व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे त्याची पुढील आंतरराष्ट्रीय विमानयात्रा आणि हॉटेल बुकिंगवरही परिणाम झाल्याचे त्याने सांगितले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आंध्र प्रदेशात ONGC च्या विहिरीतून मोठी गॅसगळती; १ किमी परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं, Video

Pune : भररस्त्यात दुचाकीस्वारावर कोयत्याने हल्ला; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

भारतात अश्लील अन् हिंसक कंटेंटला लगाम; मेटाकडून Instagram च्या रिकमेंडेशन सिस्टीममध्ये बदल

दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली; चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

Mumbai : विरार-चर्चगेट लोकलमध्ये राडा; दोन प्रवाशांच्या भांडणात भिरकावलेला चाकू लागून भलताच प्रवासी जखमी, आरोपी अटकेत