आता येतेय IRCTC ची नवी वेबसाइट; रेल्वे मंत्र्यांनी केली मोठी घोषणा, कधी होणार लाँच? जाणून घ्या सविस्तर  
राष्ट्रीय

आता येतेय IRCTC ची नवी वेबसाइट; रेल्वे मंत्र्यांनी केली मोठी घोषणा, कधी होणार लाँच? जाणून घ्या सविस्तर

रेल्वेचं तिकीट बुक करताना वेबसाइट हँग होणं, कॅप्चा वारंवार फेल होणं, ओटीपी उशिरा येणं किंवा तत्काळ तिकीट बुकिंगदरम्यान प्रक्रिया अर्धवट थांबणं... या समस्यांचा सामना अनेक प्रवाशांना करावा लागतो. आता या त्रासातून प्रवाशांची सुटका होणार...

Mayuri Gawade

रेल्वेचं तिकीट बुक करताना वेबसाइट हँग होणं, कॅप्चा वारंवार फेल होणं, ओटीपी उशिरा येणं किंवा तत्काळ तिकीट बुकिंगदरम्यान प्रक्रिया अर्धवट थांबणं... या समस्यांचा सामना अनेक प्रवाशांना करावा लागतो. आता या त्रासातून प्रवाशांची सुटका होण्याची शक्यता आहे. आयआरसीटीसी (IRCTC) १५ जुलैपर्यंत आपली नवी आणि अधिक सक्षम वेबसाइट सुरू करण्याच्या तयारीत आहे.

जयपूरमधील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (MNIT) विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याने IRCTC वरील कॅप्चा आणि तिकीट बुकिंगदरम्यान येणाऱ्या समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केला. या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर घोषणा

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थिनीने, "सर, IRCTC वरील कॅप्चाची समस्या सोडवा,” अशी मागणी केली. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे विभागातील अधिकाऱ्याला फोन करून विद्यार्थिनीची मागणी सांगितली आणि ३० दिवसांत नवी वेबसाइट तयार होऊ शकते का, अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत नवी IRCTC वेबसाइट सुरू होईल, असे आश्वासन दिले.

नव्या वेबसाइटची गरज का भासली?

गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन तिकीट बुकिंग करताना प्रवाशांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळी वेबसाइट मंदावणे, कॅप्चा पडताळणी अयशस्वी होणे, ओटीपी वेळेवर न मिळणे आणि वेबसाइट क्रॅश होणे यासारख्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे तिकीट बुकिंगचा अनुभव अधिक सुरळीत करण्यासाठी हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.

प्रवाशांना कोणत्या सुविधा मिळू शकतात?

माध्यमांतील वृत्तांनुसार, नव्या वेबसाइटमध्ये अनेक सुधारित सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

  • अधिक वेगवान तिकीट बुकिंग प्रक्रिया : तिकीट बुक करताना होणारा विलंब कमी होऊ शकतो.

  • मोठ्या प्रमाणातील ट्रॅफिक हाताळण्याची क्षमता : एकाच वेळी लाखो प्रवासी वेबसाइट वापरत असतानाही ती सुरळीत चालू शकते.

  • तत्काळ तिकिटांच्या उपलब्धतेची स्पष्ट माहिती : उपलब्ध तिकिटांची माहिती अधिक अचूकपणे मिळू शकते.

  • सीट निवडण्याचा पर्याय : प्रवाशांना पसंतीची सीट निवडण्याची सुविधा मिळू शकते.

  • अधिक सुलभ आणि वापरकर्त्यास अनुकूल इंटरफेस : वेबसाइटचा वापर अधिक सोपा आणि सहज होण्याची शक्यता आहे.

रेल्वे प्रशासनाच्या अपेक्षेनुसार, या सुविधांमुळे वेबसाइट हँग होणे किंवा क्रॅश होण्याच्या घटना कमी होऊन प्रवाशांचा ऑनलाइन तिकीट बुकिंगचा अनुभव अधिक चांगला होऊ शकतो.

रेल्वेसाठी हा बदल महत्त्वाचा का?

सध्या रेल्वेच्या सुमारे ८८ टक्के तिकिटांचं आरक्षण ऑनलाइन पद्धतीने केलं जातं. आरक्षण केंद्रांवर जाऊन तिकीट घेणाऱ्यांची संख्या कमी होत असताना डिजिटल सेवांचा वेग, स्थिरता आणि विश्वासार्हता वाढवणं रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे. त्यामुळे आयआरसीटीसीच्या नव्या वेबसाइटकडून प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

NEET पुनर्परीक्षेपूर्वी Telegram वरील बंदी कायम; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

उरण तालुक्यात भीषण पाणीटंचाई; रानसई आणि पुनाडे धरणांनी गाठला तळ, अनेक गावांना १२ ते १५ दिवसांआड पाणी

Kalyan-Dombivli : अतिधोकादायक इमारतीतच KDMC चा आपत्कालीन कक्ष; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Pune : धरणांत १४ टक्के पाणीसाठा; पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे हाल होणार

सायबांच्या वाहनांना रेड कार्पेट! ब्रिटनच्या वाहनांना भारतात सवलत