ताजमहालची सहल आटोपून परतणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला! उभ्या स्कूल बसला ट्रकची धडक; ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ३२ जखमी X
राष्ट्रीय

ताजमहालची सहल आटोपून परतणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला! उभ्या स्कूल बसला ट्रकची धडक; ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ३२ जखमी

Agra Lucknow Expressway School Bus Accident : उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये ताजमहालची सहल आटोपून परतणाऱ्या शालेय बसला भरधाव ट्रकने धडक दिली. आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवरील या अपघातात ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, ३२ जण जखमी झाले आहेत.

Mayuri Gawade

कन्नौज : शाळेची सहल म्हटलं की मुलांचा आनंद काही वेगळाच असतो. मित्रांसोबत केलेली धमाल, फिरण्याची मजा आणि असंख्य आठवणी घेऊन विद्यार्थी घरी परतत असतात. अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातील एका शाळेचे विद्यार्थी ताजमहालची सहल आटोपून घरी परतत होते. मात्र, परतीच्या प्रवासात त्यांच्यावर काळाने घाला घातला. आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर विद्यार्थ्यांना शौचालयात जाण्यासाठी शालेय बस महामार्गाच्या कडेला थांबवण्यात आली होती. त्याच वेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, ३२ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी (दि. २४) पहाटे कन्नौज जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली.

विद्यार्थ्यांसाठी महामार्गाच्या कडेला थांबवली होती बस

पीटीआयच्या वृत्तानुसार, कौशांबी येथील ओरिएंटल पब्लिक स्कूलचे विद्यार्थी सहलीसाठी आग्रा येथे गेले होते. ताजमहाल पाहिल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेचे कर्मचारी बसने परतत होते. या बसमध्ये विद्यार्थ्यांसह एकूण ५० जण प्रवास करत होते.

मंगळवारी पहाटे सुमारे ६ वाजता बस कन्नौज जिल्ह्यातील ठठिया परिसरात पोहोचली. त्यावेळी काही विद्यार्थ्यांना शौचालयात जाण्यासाठी चालकाने बस एक्स्प्रेसवेच्या कडेला थांबवली होती. मात्र, त्याच वेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने उभ्या बसला जोरदार धडक दिली. या धडकेत बसच्या मागील भागाचं मोठं नुकसान झालं.

४ विद्यार्थ्यांचा मृत्यू; ३२ जण जखमी

या अपघातात एकूण ३२ जण जखमी झाले. त्यामध्ये २४ विद्यार्थी आणि शाळेतील ८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कन्नौजचे पोलिस अधीक्षक विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच पोलिस, उत्तर प्रदेश एक्स्प्रेसवेज औद्योगिक विकास प्राधिकरणाचे (UPEIDA) कर्मचारी आणि महामार्गावरून जाणारे इतर प्रवासी मदतीसाठी धावले.

सर्वांनी मिळून अपघातग्रस्त बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. त्यानंतर जखमींना रुग्णवाहिकांमधून जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी चार विद्यार्थ्यांना मृत घोषित केलं.

गंभीर जखमींना कानपूरला हलवलं

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या अपघातात शाळेचे मुख्याध्यापक आणि एक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारांसाठी कानपूर येथे हलवण्यात आलं आहे. तर २२ विद्यार्थ्यांना तिर्वा येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

अपघातानंतर कन्नौजचे जिल्हाधिकारी आशुतोष मोहन अग्निहोत्री आणि पोलिस अधीक्षक विनोद कुमार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच उपचारांबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली.

अपघातातून सुखरूप बचावलेल्या इतर विद्यार्थ्यांना आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यासाठी दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघाताप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'हापूस'वर गुजरातचा डोळा; नावावर वलसाडची दावेदारी, बाजारपेठ काबीज करण्याचा डाव

'गोकुळ'च्या अध्यादेशासाठी मोजले ८० लाख! राज्य सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांना देयक अदा

साखर कारखानदारीला 'घरघर'! ऊस गाळप करणाऱ्या राज्यातील सहकारी कारखान्यांची संख्या १०० च्या आत, कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष समिती

Mumbai : उद्यान, मैदानात आता राज्य सुरक्षा मंडळाचे जवान तैनात; अमित साटम यांची आयुक्तांबरोबर बैठक संपन्न

Mumbai : बांधकामस्थळी सेफ्टी नेट बंधनकारक; तरंच सीसी, ओसी, सभागृहाची मंजुरी