बेंगळुरू : कर्नाटकची अंतिम मतदार यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली असून, विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेनंतर राज्यातील मतदारांच्या संख्येत सुमारे एक कोटींची घट झाली आहे. राज्य मुख्याधिकारी व्ही. अनबुक्कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, एसआयआर प्रक्रियेनंतर दक्षिण भारतातील या राज्यामध्ये आता एकूण ४,५५,००,०११ (४ कोटी ५५ लाख) मतदार आहेत. या विशेष मोहिमेपूर्वी राज्यामध्ये ५,५४,३२,३१४ मतदार होते, मात्र अंतिम यादीनुसार आता मतदारांच्या संख्येत ९९,३२,००० ची घट झाली आहे.
मतदारांची संख्या
एकूण मतदारांची संख्या ४,५५,००,०११ इतकी असून त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या २,२५,८३,१०७, महिला मतदारांची संख्या २,२९,१४,0६३ इतकी आहे तर थर्ड जेंडर मतदारांची संख्या २,८४१ इतकी आहे. १८-१९ वयोगटातील तरुण मतदारांची संख्या ६.८३ लाखांहून अधिक असून ८५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयोवृद्ध मतदारांची संख्या ३,९२,१३४ तर अनिवासी भारतीयांची संख्या ३,२५२ इतकी आहे.
नव्या मतदारांची भर
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ३० जून ते २७ ऑक्टोबर दरम्यान कर्नाटकात एसआयआर मोहीम राबविण्यात आली. २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांवर नोटीस, चौकशी आणि सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करून मंगळवारी अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली. प्रारूप यादी प्रसिद्ध झाली तेव्हा मतदारांची संख्या ४,४६,८०,१५१ होती. १६ जूनपासून आतापर्यंत ८,१९,७१४ नवीन मतदारांची भर पडली आहे.