लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीला मंजुरी; नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांचा निर्णय 
राष्ट्रीय

लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीला मंजुरी; नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांचा निर्णय

लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी सोमवारी केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीला मंजुरी दिली.

Swapnil S

लेह : लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी सोमवारी केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीला मंजुरी दिली. या निर्णयामुळे लडाखमधील जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली असून सक्सेना यांनी हा दिवस ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. नुब्रा, शाम, चांगथांग, झांस्कर आणि द्रास अशी या नवीन पाच जिल्ह्यांची नावे आहेत. या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे लडाखमधील एकूण जिल्ह्यांची संख्या आता सात झाली आहे.

यापूर्वी लडाखमध्ये केवळ लेह आणि कारगिल हे दोनच जिल्हे होते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने लडाख हा देशातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे, मात्र लोकसंख्या कमी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, चीन आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या ८६,९०४ चौरस किलोमीटर क्षेत्राची लोकसंख्या २.७४ लाख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित आणि समृद्ध लडाखच्या संकल्पनेनुसार हा विकास केला जात असल्याचे सक्सेना यांनी नमूद केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृह मंत्रालयाने ऑगस्ट २०२४ मध्ये या निर्णयाला मंजुरी दिली होती. या परिवर्तनीय निर्णयामुळे प्रशासनाचे विकेंद्रीकरण होईल आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत सार्वजनिक सेवा जलद गतीने पोहोचण्यास मदत होईल, असेही नायब राज्यपालांनी सांगितले. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासकीय कामात सुलभता येण्यासोबतच विकास, रोजगार आणि उद्योजकतेच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्राने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवून लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश घोषित केले होते. त्यानंतर लडाखचा कारभार थेट केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली आला आहे.

प्रशासनात फेरबदलाचे वारे! गृहनिर्माण, जलसंपदा विभागांना मिळणार नवे सचिव

मुंबई महापालिकेच्या 'त्या' विधी अधिकाऱ्यांना दिलासा; नियुक्तीच्या तारखेपासून ‘नियमित कर्मचारी’ मानण्याचा HC चा आदेश

Mumbai : वाढदिवसाच्या मेजवानीत एसी बंद; ग्राहक आयोगाचा रेस्टॉरंटला दंड

भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक व्यापार करार; भारतीय वस्तूंना न्यूझीलंडमध्ये विनाशुल्क प्रवेश, १५ वर्षांत २० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

Mumbai : बलात्कारप्रकरणी पालिका सहाय्यक आयुक्ताला अटक; लग्न झाल्याची बाब पीडितेपासून लपवली