लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख (Photo-X/@SpokespersonMoD)
राष्ट्रीय

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे नवे लष्करप्रमुख असतील, अशी घोषणा संरक्षण मंत्रालयाकडून शनिवारी करण्यात आली.

Swapnil S

नवी दिल्ली: लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे नवे लष्करप्रमुख असतील, अशी घोषणा संरक्षण मंत्रालयाकडून शनिवारी करण्यात आली. सध्या लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत असलेले लेफ्ट. जन. सेठ हे ३० जून रोजी आपला पदभार स्वीकारतील. विद्यमान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लेफ्ट. जन. धीरज सेठ हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए खडकवासला) माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर १९८६ मध्ये ते भारतीय लष्कराच्या 'आर्मर्ड कोअर'मध्ये दाखल झाले. गेल्या जवळपास चार दशकांच्या आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत त्यांनी लष्कराच्या विविध आघाड्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

सेठ यांनी वाळवंटी भागात 'आर्मर्ड रेजिमेंट', पश्चिम आघाडीवर 'आर्मर्ड ब्रिगेड' आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी दलाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. लेफ्ट. जन. म्हणून त्यांनी भारतीय लष्कराच्या मुख्य स्ट्राईक फॉर्मेशन्सपैकी एक असलेल्या 'सुदर्शन चक्र कॉप्स'चे नेतृत्व केले. याशिवाय त्यांनी 'दिल्ली एरिया'चे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून काम पाहिले असून, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लष्करी कार्यक्रम आणि औपचारिक जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या आहेत.

दुर्मिळ बहुमान

सेठ यांनी 'दक्षिण पश्चिम कमांड' आणि 'दक्षिण कमांड' अशा दोन महत्त्वाच्या ऑपरेशनल कमांड्सचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. दोन वेगवेगळ्या ऑपरेशनल कमांड्स सांभाळण्याचा आणि अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ धोरणात्मक नेतृत्व करण्याचा दुर्मिळ बहुमान त्यांना मिळाला आहे. लष्कराचे धोरणात्मक नियोजन, सैन्य व्यवस्थापन आणि क्षमता विकासामध्ये त्यांनी बजावलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

Himachal Tragedy : नियंत्रण सुटून प्रवासी बस थेट १०० फूट खाली कोसळली; भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, Video

कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; ६ लाख शेतकऱ्यांना ५ हजार कोटींचे वितरण, महिनाभरात ८० टक्के शेतकऱ्यांना मिळणार लाभ - मुख्यमंत्री

‘गणपती’साठी ST च्या ५ हजार गाड्या; ७ ते २५ सप्टेंबर दरम्यान कोकणात विशेष बसेस सोडणार

पश्चिम रेल्वेच्या गणेशोत्सवासाठी ४२ गाड्या; पाहा संपूर्ण वेळापत्रक

HIV, सिफिलिस तपासणी अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केले तर कायदेशीर कारवाई, FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा रक्तपेढ्यांना इशारा