राष्ट्रीय

LPG टंचाईने अॅमेझॉनवरील 'रेडी-टू-ईट', पॅकेज्ड फूडच्या मागणीत वाढ; इन्स्टंट नूडल्स, पॅकेज्ड फूड, स्नॅक्स, शीतपेयांची मागणी १५ टक्क्यांनी वाढली

देशात सुरू असलेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'अॅमेझॉन इंडिया'वर तयार जेवण (Ready-to-eat meals), इन्स्टंट नूडल्स, पॅकेज्ड फूड, स्नॅक्स आणि शीतपेयांच्या मागणीत १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : देशात सुरू असलेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'अॅमेझॉन इंडिया'वर तयार जेवण (Ready-to-eat meals), इन्स्टंट नूडल्स, पॅकेज्ड फूड, स्नॅक्स आणि शीतपेयांच्या मागणीत १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

ही वाढ केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नसून हैदराबाद, कोलकाता, चेन्नई यांसारख्या मेट्रो शहरांसह सोनीपत आणि पणजी यांसारख्या टायर-२ आणि टायर-३ शहरांमध्येही दिसून येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून कमीत कमी वेळात तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. अॅमेझॉन डॉट इनवर इन्स्टंट नूडल्स, पॅकेज्ड मील, स्नॅक्स आणि पेये या श्रेणींमध्ये १५ टक्क्यांहून अधिक वाढ पाहायला मिळत आहे.

ही मागणी विशेषतः कंपनीच्या क्विक कॉमर्स विभाग असलेल्या 'अॅमेझॉन नाऊ'वर अधिक आहे. दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बेंगळुरूच्या काही भागांतील ग्राहक त्वरित गरजांसाठी क्विक डिलिव्हरीवर अवलंबून असल्याने, अॅमेझॉन नाऊवरील विक्रीत महिनाभरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

वाढत्या मागणीचा विचार करून अॅमेझॉन इंडियाने उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी खास 'रेडी टू ईट स्टोअर' सुरू केले आहे. गॅस नेटवर्कचा विस्तार वेगाने करणाऱ्या राज्यांना केंद्राने व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.

टंचाईचे कारण काय?

पुरवठा विस्कळीत : पश्चिम आशियातील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात एलपीजीच्या वापरात १७.७ टक्क्यांची घट झाली आहे.

आयात अवलंबित्व : भारत आपल्या गरजेच्या ६० टक्के एलपीजी आयात करतो. हा पुरवठा प्रामुख्याने 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' मार्गे होतो. तो सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तणावामुळे प्रभावित झाला आहे.

घरगुती ग्राहकांना प्राधान्य: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, परिस्थिती चिंताजनक असली तरी आम्ही घरगुती ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच पुरवठा करत आहोत. रिफायनरींना देशांतर्गत उत्पादन वाढवण्यास सांगण्यात आले असून घरगुती स्वयंपाकघरांना प्राधान्य दिले जात आहे.

व्यावसायिक वापरावरील निर्बंध हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यावसायिक वापरासाठी एलपीजी पुरवठ्यावर सुरुवातीला कपात करण्यात आली होती, मात्र आता तो मर्यादित स्वरूपात पूर्ववत करण्यात आला आहे.

डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; पुण्यातील घटनेचा VIDEO व्हायरल

मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा; तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण

प्रयागराजमधील ड्रग्जची 'फॅक्टरी' उद्ध्वस्त; गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ची कारवाई, ६९.७५९ किलो एमडी जप्त

एसआयटीकडून चौकशी करा! डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फलटणमध्ये जनआक्रोश मोर्चा

महापालिकांना २७९२ कोटींचे GST भरपाई; मुंबई महापालिकेला सर्वाधिक १२९४ कोटी