लखनौ : आयसीयू म्हणजे अतिदक्षता विभाग. डॉक्टरांच्या खास परवानगीशिवाय या विभागात कोणीही जाऊ शकत नाही. तसेच तेथे जायचे असल्यास अनेक व्यवधाने पाळावी लागतात. पण, आयसीयूत दाखल केलेल्या वडिलांना आपल्या मुलीचे लग्न पाहायचे होते. डॉक्टरांनी व रुग्णालय प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेत थेट दोन सख्ख्या बहिणींचा विवाह त्यांच्या आजारी वडिलांसमोर आयसीयूत पार पडला.
लखनौच्या इरा वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीयूत सय्यद जुनैद इक्बाल यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना श्वास घेतानाही त्रास होत आहे. इक्बाल यांना तन्वीला आणि दरख्शां या दोन मुली आहेत. त्यांचे २२ जूनला मुंबईत लग्न आणि रिसेप्शन ठरले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावली. १५ दिवसांपूर्वी ते इरा रुग्णालयाच्या आयसीयूत दाखल झाले. डॉक्टरांनी शर्थीने प्रयत्न केले. तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे वडिलांनी आपल्या मुलींचे लग्न आपल्या समोर करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी इरा मेडिकल कॉलेज प्रशासनाकडे परवानगी मागितली. इरा मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी आयसीयूमध्ये लग्नाला परवानगी दिली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने वराला आणि मौलवींना वडिलांसमोर आयसीयूमध्ये बोलावून दोन्ही मुलींचे लग्न लावून दिले. तन्वीला हिचे १३ जून तर दारख्शनचा निकाह १४ जून रोजी पार पडला. यावेळी यावेळी डॉक्टर आणि नर्स वरातींच्या भूमिकेत होते.