नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था आणि राजकीय पक्षांनी राष्ट्रीय हितासाठी एकत्र येऊन देशाच्या शत्रूंविरोधात एकजुटीने लढले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. दसरा उत्सवात सहभागी होताना मोदी म्हणाले की, संकट कितीही मोठे किंवा कठीण असले, तरी इतरांवर अवलंबून राहून स्वस्थ बसू नये. प्रत्येकाने स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव ठेवली पाहिजे. आपले विचार एकसमान असावेत आणि देशातील सर्व संस्था व सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रीय हितासाठी एकत्र उभे राहावे. याच भावनेने आपण पुढे गेले पाहिजे आणि देशाच्या शत्रूंविरोधात एकजुटीने लढले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.
आपल्या सरकारचे उद्दिष्ट भारताला आत्मनिर्भर बनविणे हे असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले, ‘आपल्या संसाधनांवर आपला विश्वास असला पाहिजे. आपल्या संकल्पाचे सामर्थ्यात रूपांतर करून स्वतःच्या कठोर परिश्रमातून उपाय शोधले पाहिजेत. कारण श्रीरामांनी आपल्याला शिकवले आहे की, अडचणी आपला प्रवास थांबवू शकत नाहीत.’
‘रामराज्या’मध्ये कोणाशीही भेदभाव केला जात नाही, तर प्रत्येकाला न्याय आणि समान संधी मिळतात, असे त्यांनी सांगितले. सत्तेचा उद्देश राज्य करणे नसून लोककल्याण सुनिश्चित करणे हा आहे. हाच भगवान श्रीरामांनी घालून दिलेला आदर्श आहे, असेही मोदी म्हणाले. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण आहे. शत्रू कितीही सामर्थ्यवान असला, तरी ‘जेव्हा आपण सत्य आणि मानवतेच्या बाजूने उभे राहतो, तेव्हा अखेरीस विजय आपलाच होतो,” असा विश्वास हा सण लोकांना देतो, असे पंतप्रधानांनी सांगितले. दसऱ्याची भावना ही नेहमीच भारताच्या तत्त्वज्ञानाच्या केंद्रस्थानी राहिली आहे, असेही मोदी म्हणाले.