NEET-UG 2026 Re-Exam : विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षेसाठी १५ मिनिटे अधिक, रफवर्कसाठी जास्त जागा; NTA च्या नव्या घोषणा 
राष्ट्रीय

NEET-UG 2026 Re-Exam : विद्यार्थ्यांना दिलासा! परीक्षेसाठी १५ मिनिटे अधिक, रफवर्कसाठी जास्त जागा; NTA च्या नव्या घोषणा

NEET-UG 2026 पुनर्परीक्षेसाठी NTA ने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. परीक्षेसाठी १५ मिनिटे अतिरिक्त वेळ, रफवर्कसाठी चार पाने आणि प्रश्नपत्रिकेच्या मांडणीत बदल करण्यात आले आहेत. २१ जून रोजी पुनर्परीक्षा होणार आहे.

Mayuri Gawade

NEET-UG 2026 च्या पुनर्परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक असताना राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अधिक सोयीस्कर वातावरण मिळावे यासाठी अतिरिक्त वेळ, रफवर्कसाठी अधिक पाने आणि प्रश्नपत्रिकेच्या मांडणीत बदल करण्यात आले आहेत.

परीक्षेसाठी मिळणार १५ मिनिटे अधिक

NTA ने दिलेल्या माहितीनुसार, NEET-UG 2026 पुनर्परीक्षेचा कालावधी आता १८० मिनिटांऐवजी १९५ मिनिटांचा असणार आहे. परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत होईल. या अतिरिक्त १५ मिनिटांमध्ये उपस्थिती नोंदवणे आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष लेखनाच्या वेळेत कोणतीही कपात होणार नाही.

रफवर्कसाठी आता चार पाने

विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर NTA ने प्रश्नपत्रिकेत रफवर्कसाठी उपलब्ध जागाही वाढवली आहे. यापूर्वी दोन पाने दिली जात होती. आता विद्यार्थ्यांना चार पाने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. गणिती मोजमाप, आकृत्या किंवा इतर रफवर्क करण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

प्रश्नपत्रिकेच्या मांडणीतही बदल

आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे रफवर्कची दोन पाने आता प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीलाच देण्यात येणार आहेत. उर्वरित दोन पाने शेवटी असतील. यापूर्वी सर्व रफवर्कची पाने प्रश्नपत्रिकेच्या शेवटी असायची. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना, विशेषतः डावखुऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी NTA कडे आल्या होत्या.

विद्यार्थ्यांच्या सूचनांनंतर निर्णय

NTA च्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे हे बदल करण्यात आले आहेत. परीक्षा अधिक सुलभ आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याचा प्रयत्न असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

२१ जूनला पुनर्परीक्षा

पेपरफुटीच्या आरोपांनंतर NTA ने ३ मे रोजी झालेली NEET-UG 2026 परीक्षा १२ मे रोजी रद्द केली होती. तपासादरम्यान काही उमेदवारांच्या मोबाईलवर परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका पोहोचल्याचे समोर आले होते. यानंतर पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ही परीक्षा २१ जून रोजी देशभरात होणार आहे.

भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mumbai : 'मीटरने चला' म्हटलं तर ३०० रुपयांची मागणी! BKC सार्वजनिक वाहतूक मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रिक्षाचालकांविरोधात तक्रारी

Kalyan : 'माझी काय चूक?'; ५ तास ट्रेन लेट झाल्यामुळे प्लॅटफॉर्म तिकीट एक्सपायर, तरुणाकडून ५०० रुपयांचा दंड, VIDEO

यंदाचा एल निनो तीव्र रूप धारण करणार; तो भयंकर आणि खर्चिक ठरण्याची शास्त्रज्ञांना भीती

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर; अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज व युवा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव