राष्ट्रीय

भाजपविरोधात एकीचा नारा; सत्ता उलथवण्यासाठी देशभरातील नेते एकवटले

स्व. चौधरी देवालाल यांच्या जयंतीनिमित्त रविवारी इंडियन नेशनल लोकदलने फतेहाबादमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते

वृत्तसंस्था

“देशभरातील बिगरभाजप नेत्यांनी भाजपविरोधात एकीचा नारा दिला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांनी मिळून एकत्रित लढा द्यावा,” अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी रविवारी व्यक्त केली. दरम्यान, नितीशकुमार आणि लालुप्रसाद यादव यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेऊन भाजपविरोधी आघाडीत येण्याचे आवाहन केले.

माजी उपपंतप्रधान स्व. चौधरी देवालाल यांच्या जयंतीनिमित्त रविवारी इंडियन नेशनल लोकदलने फतेहाबादमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील दिग्गज नेते मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माकप नेते सीताराम येचुरी आणि जेडीयूचे महासचिव के. सी. त्यागी उपस्थित होते.

“कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केले; मात्र केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या तत्काळ मान्य केल्या नाहीत. सध्या शेतकरी आत्महत्या करत आहेत; मात्र त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. आमचे शेतकरी आणि तरुण आत्महत्या करत आहेत; परंतु सरकारने यावर अजूनही कोणताही तोडगा काढलेला नाही. सरकार बदलणे, हाच त्या समस्येवर खरा तोडगा आहे,” असे पवार यांनी सांगितले. “शेतकरी नेत्यांविरोधातील खटले मागे घेतले जातील, असे आश्वासन सरकारने दिले होते; मात्र ते आश्वासन अजूनही पाळले नाही,” असे पवार म्हणाले.

ही पहिलीच आघाडी - नितीशकुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले की, “ही तिसरी आघाडी नसून पहिलीच आघाडी आहे. आपण सर्व एकत्र राहिलो, तरच आपण मजबूत होऊ. मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. मोकळ्यात अफवा आहेत. मी फक्त भाजपविरोधात विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. कारण निवडणुकीत भाजपने आमच्या उमेदवारांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला होता. केंद्र सरकारने मागास राज्यांसाठी ज्या घोषणा केल्या होत्या; मात्र सरकारने पूर्ण केल्या नाहीत. बिहारमध्ये सात पक्ष एकत्रपणे काम करत आहे. २०२४मध्ये भाजपला बिहारमध्ये निवडून येण्यासाठी कोणतीही संधी मिळणार नाही,” असे नितीशकुमार यांनी ठणकावून सांगितले.

केतनला कुणी ढकललं? सिया गोयलच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीसाठी पोलिसांची न्यायालयात धाव

बंगळुरूत काळाचा घाला! दगडखाणीत ४० फुटांवरून कोसळला ग्रॅनाइटचा महाकाय खडक; ८ मजुरांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

अटल टनेलबाहेर भरधाव स्कॉर्पिओला भीषण अपघात; लोखंडी सळ्या आरपार घुसल्याचा VIDEO समोर; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

Mumbai Rains : गटारात पडलेल्या व्यक्तीची दहिसर पोलिसांकडून सुखरूप सुटका; बचावकार्याचा Video व्हायरल

ठाण्याला पावसाने झोडपले; धरण क्षेत्रातही दमदार हजेरी