नवी दिल्ली : दिल्लीतील तिलक नगर परिसरात रस्त्याच्या निकृष्ट कामावरून प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका तरुणावर PWD मंत्री प्रवेश वर्मा यांनी हात उगारल्याचा आरोप करण्यात आला आहे. रविवारी (दि. २७) रस्त्याची पाहणी सुरू असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. संबंधित तरुणाने रस्त्याचा पृष्ठभाग खराब असल्याचे दाखवताच वर्मा यांनी त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणावर आम आदमी पक्षाने (AAP) आक्रमक भूमिका घेत प्रवेश वर्मा यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
रस्ता दाखवताना वाद झाल्याचा दावा
माहितीनुसार, या घटनेत आरोप करण्यात आलेल्या तरुणाची ओळख साहिल अशी झाली आहे. साहिलने वृत्तसंस्था ANI शी बोलताना आपण तिलक नगरचे AAP आमदार जरनैल सिंह यांच्या सोशल मीडिया टीमचे काम पाहत असल्याचे सांगितले. PWD विभागाने रस्त्याची पाहणी करण्यासाठी बोलावल्याने आपण तिथे गेलो होतो, असा दावा त्याने केला.
साहिलच्या म्हणण्यानुसार, त्याने प्रवेश वर्मा यांना रस्त्याची खराब अवस्था दाखवली. रस्त्याचा पृष्ठभाग हातानेच निघत असल्याचे दाखवत असताना वर्मा यांनी संतापून त्याच्यावर हात उगारला. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही साहिलचा आरोप आहे.
'माझ्यावर हात उगारला, धमकीही दिली'
"आम्ही PWD विभागाच्या बोलावण्यावरून रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो. मी रस्त्याचा पृष्ठभाग कसा तुटत आहे, हे दाखवत होतो. हे दाखवल्यानंतर मंत्र्यांनी माझ्यावर हात उगारला. त्यांच्या सहकाऱ्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली,” असा दावा साहिलने केला.
या घटनेवेळी पोलिस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असल्याचेही साहिलने म्हटले. या प्रकरणात प्रवेश वर्मा यांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्याने केली.
'मंत्री घटनास्थळावरून निघून गेले'
AAP आमदार जरनैल सिंह यांनीही प्रवेश वर्मा यांच्यावर आरोप केले आहेत. वर्मा यांनी रस्त्याची खराब अवस्था कुठे आहे, हे दाखवण्यास सांगितले होते. त्यानंतर हाताने रस्ता तोडून पाहिला असता त्याचा पृष्ठभाग निघाल्याचा दावा सिंह यांनी केला.
यानंतर कारवाई करण्याऐवजी वर्मा यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीवर हात उगारला आणि घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप जरनैल सिंह यांनी केला. विकसनपुरी पोलीस ठाण्याचे SHO घटनास्थळी उपस्थित असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच पोलिसांच्या ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून प्रवेश वर्मा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्याचे सिंह यांनी सांगितले.
'निकृष्ट साहित्याचा वापर'
AAP दिल्ली अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनीही या घटनेवरून प्रवेश वर्मा यांच्यावर टीका केली. रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर झाल्याचा आरोप त्यांनी केला. रस्त्याची खराब गुणवत्ता समोर आल्यानंतर वर्मा यांच्याकडे याचे उत्तर नव्हते आणि त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीवर हात उगारला, असा दावा भारद्वाज यांनी केला.
VIDEO सोशल मीडियावर समोर
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये प्रवेश वर्मा एका तरुणाचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असलेला मोबाईल बाजूला करून त्यानंतर त्याच्यावर हात उगारल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ AAP ने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रस्त्याच्या गुणवत्तेवरून सुरू झालेल्या या वादामुळे दिल्लीतील राजकीय वातावरणातही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. AAP ने या घटनेवरून प्रवेश वर्मा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.