(Photo-X/@narendramodi)
राष्ट्रीय

प्रश्न नको, उत्तरे शोधा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांना सल्ला

'विद्यार्थी केवळ पदव्या घेऊनच नव्हे, तर स्वप्ने घेऊन 'आयआयटी' या संस्थेतून बाहेर पडत आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : 'विद्यार्थी केवळ पदव्या घेऊनच नव्हे, तर स्वप्ने घेऊन 'आयआयटी' या संस्थेतून बाहेर पडत आहेत. इथे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात कुठेतरी वेगळे विचार घोळत आहेत. म्हणूनच, शिकत राहा; केवळ प्रश्न विचारू नका, तर त्याची उत्तरेही शोधा', असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

आयआयटी दिल्लीच्या ५७ व्या दीक्षांत समारंभात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नमूद केले की, भारताला 'विकसित भारत' बनवण्याच्या प्रवासात देशातील तरुणांचे आयुष्य आणि त्यांचे निर्णय अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. तरुण जो काही निर्णय घेतील, त्याचा थेट परिणाम देशाच्या भवितव्यावर होईल. बदलत्या युगात जे सतत नवीन शिकत राहतील, तेच यशस्वी होतील, असा मंत्रही त्यांनी यावेळी दिला.

जगातील वेगाने बदलणारे धोरणात्मक समीकरण आणि तंत्रज्ञानाचा वेग यावर भाष्य करताना ते म्हणाले, आज जगाचे शक्तीसंतुलन सातत्याने बदलत आहे. पुढील २०-३० वर्षांत जग कसे असेल, हे आज कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. मात्र, जेव्हा जेव्हा असा बदलाचा काळ येतो, तेव्हा तो आपल्यासोबत नवी आव्हाने आणि नव्या संधी घेऊन येतो. तंत्रज्ञान बदलेल, उद्योग आणि व्यवसाय विकसित होतील; पण जो सतत शिकत राहील, तोच यशस्वी होईल, असे मोदी म्हणाले. या पदवीदान समारंभात ५८७ पीएचडी संशोधकांसह ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

सुपरकॉम्प्युटिंग सुविधा लोकांर्पित

या कार्यक्रमादरम्यान मोदींनी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेसिडेंट्स गोल्ड मेडल, डायरेक्टर्स गोल्ड मेडल, शंकर दयाळ शर्मा गोल्ड मेडल आणि परफेक्ट टेन गोल्ड मेडल देऊन सन्मानित केले. तसेच, आयआयटी दिल्लीच्या सोनिपत कॅम्पसमध्ये 'परम प्रज्ञा' या एआय-आधारित हाय-परफॉर्मन्स सुपरकॉम्प्युटिंग सुविधेचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. या सुविधेमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स आणि प्रगत संगणकीय संशोधनाला मोठी गती मिळणार आहे.

मी बाबा बागेश्वर नाही... मोदींची मिश्कील टिप्पणी

आयआयटी दिल्लीच्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना मोदी यांनी प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू बाबा बागेश्वर यांचा उल्लेख करत एक मिश्कील टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम मंदिराचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे 'बाबा बागेश्वर' म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या अध्यात्मिक प्रवचनांसाठी आणि 'दिव्य दरबारां'साठी ते ओळखले जातात. आज तुम्ही सर्वजण इथे एकत्र जमला आहात, पण तुमच्या मनात काही ना काही विचार नक्कीच सुरू असतील. आता मी काही बाबा बागेश्वर नाही, तरीही तुमच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज लावू शकतो.

सर्वांचा अभिमान...

विद्यार्थी फक्त पदवी घेऊन बाहेर पडत नसून देशासाठी काहीतरी करून दाखवण्याचे स्वप्न घेऊन पुढे जात आहेत. आज तुमचे कुटुंब ज्याप्रमाणे अभिमान बाळगत आहे, तसाच मलाही तुम्हा सर्वांचा अभिमान आहे.

थोड्या हलक्या-फुलक्या शैलीत पंतप्रधान पुढे म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये काही मुली असत्या तर अजून चांगले झाले असते. माफ करा, काहीच नाही तर अनेक मुली असत्या तर खूप छान झाले असते.

संशोधन, नवोपक्रमाला प्रोत्साहन

पंतप्रधानांनी तरुणांना संशोधन क्षेत्रातील संधींचा फायदा घेण्याचे आवाहन केले. देशातील संशोधन परिसंस्था मजबूत करण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय संशोधन फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून संशोधन क्षेत्रासाठी १ लाख कोटी रुपयांच्या निधीची व्यवस्था केली जात आहे. 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' या उपक्रमाद्वारे आता देशातील लहानात लहान शहरांमधील विद्यार्थ्यांपर्यंत जागतिक दर्जाची संशोधन नियतकालिके मोफत पोहोचत आहेत. प्रतिभावान तरुणांना उच्च दर्जाचे संशोधन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आजचे राशिभविष्य, ९ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Independence Day 2026 : तिरंगी बांगड्यांचा ट्रेंड! १५ ऑगस्टसाठी पाहा 'हे' सुंदर पर्याय

रात्री लवकर झोप येत नाही? आयुर्वेदातील 'या' सवयी तुमच्यासाठी ठरतील उपयोगी

घराभोवती डासांची पैदास रोखण्यासाठी काय कराल? आरोग्य मंत्रालयाने सांगितले 'हे' सोपे उपाय

Himachal Tragedy : नियंत्रण सुटून प्रवासी बस थेट १०० फूट खाली कोसळली; भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, Video