विकास हाच माझा ‘मंत्र’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन (Photo-X)
राष्ट्रीय

विकास हाच माझा ‘मंत्र’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

देशाचा विकास हाच आपला मंत्र असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तमिळनाडूच्या जनतेची सेवा करण्याची आणि मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासोबत काम करून राज्याची प्रगती साधण्याची कटिबद्धता व्यक्त केली.

Swapnil S

चेन्नई : देशाचा विकास हाच आपला मंत्र असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तमिळनाडूच्या जनतेची सेवा करण्याची आणि मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासोबत काम करून राज्याची प्रगती साधण्याची कटिबद्धता व्यक्त केली.

गेल्या १२ वर्षांत विविध क्षेत्रांत झालेल्या वेगवान प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी संरक्षण निर्यातीत झालेल्या लक्षणीय वाढीचाही उल्लेख केला.

मुख्यमंत्री विजय यांच्या उपस्थितीत सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या रेल्वे, रस्ते आणि पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केल्यानंतर पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी विकासासाठी आपली कटिबद्धता अधोरेखित केली.

चेन्नई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना एकत्रितपणे हिरवा झेंडा दाखवण्याचे संकेत दिले. केंद्र आणि राज्य सरकारमधील संबंधांच्या दृष्टीने राजकीय व प्रशासकीय महत्त्व असलेल्या या कार्यक्रमात मोदी यांनी विजय यांचा हात धरून संयुक्तपणे मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवला. चेन्नई मेट्रोचा दुसरा टप्पा केंद्र सरकार आणि तमिळनाडू राज्य सरकार यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आला आहे.

त्यानंतर पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनावेळीही पंतप्रधानांनी मुख्यमंत्री विजय यांचा हात धरून संयुक्तपणे प्रकल्पांचे उद्घाटन केले.

मोदी म्हणाले, ‘देशाचा विकास हाच मी नेहमी माझा मंत्र मानला आहे. मुख्यमंत्री असताना एखाद्या राज्याच्या जनतेच्या अपेक्षा काय असतात, हे मला समजले. पंतप्रधान झाल्यानंतर केवळ त्या आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला नाही, तर राज्यांना त्यांची विकासाची उद्दिष्टे साध्य करता यावीत, यासाठीही प्रयत्न केले,’ असे त्यांनी सांगितले.

तमिळनाडूचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत एम. करुणानिधी आणि जे. जयललिता यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम, एडप्पाडी के. पलानीस्वामी आणि एम. के. स्टॅलिन यांच्यासोबतही काम केले.

सरकारे बदलू शकतात; मात्र तमिळनाडूचा विकास करण्याचा आणि राज्यातील जनतेची सेवा करण्याचा माझा संकल्प कायम आहे. जनतेची सेवा करण्याच्या याच निर्धारातून मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत आम्ही राज्याच्या विकासाला पुढे नेत आहोत,” असे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, ‘सरकारप्रमुख म्हणून जनतेवरील माझा विश्वास आणि सहकारी संघराज्यवादावरील माझी निष्ठा दृढ झाली आहे. जनतेच्या आशीर्वादाने सरकारप्रमुख म्हणून सार्वजनिक सेवेची २५ वर्षे पूर्ण केली. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून जनतेने मला प्रथम मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून सेवा करण्याची संधी दिली. या २५ वर्षांत आपल्या लोकशाहीच्या दोन महत्त्वपूर्ण शक्तींवरील माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे. पहिली शक्ती म्हणजे देशातील जनता आणि दुसरी म्हणजे सहकारी संघराज्यवाद,’ असे ते म्हणाले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘इंडिया’ आघाडीचा आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा; राहुल गांधींनी दिली माहिती

Mumbai : राडारोडा टाकला तर 'दंड'; आजपासून कारवाईचा बडगा, नोंदणी आणि वाहनांवर ट्रॅकिंग यंत्रणा बंधनकारक

Delhi Protest : शांततापूर्ण आंदोलनांवर कारवाई नको; सर्वोच्च न्यायालयाची तंबी, मेट्रो, इंटरनेट सेवा पूर्ववत करा

नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे घरे, पूल वाहून गेले; ८० हून अधिक जणांची सुटका, ५ बेपत्ता, Video

CJP Protest : आंदोलन होणार तीव्र; झुरळांचा इशारा, ‘इंडिया’ आघाडीसह सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन