देशातील महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांसाठी आज (दि.९) मतदान सुरू आहे. आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी येथे सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मतदानासाठी निवडणूक आयोगाने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली असून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पहाटेपासूनच अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसत आहेत. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडत आहेत. अशातच, पुदुच्चेरीतील VOC गव्हर्नमेंट स्कूल मतदान केंद्रावर गुरुवारी एक अनोखा अनुभव पाहायला मिळाला.
'निला' नावाचा साडी परिधान केलेला ह्युमनॉइड रोबोट मतदारांचे स्वागत करताना दिसला, ज्यामुळे सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांना तंत्रज्ञानाची विशेष जोड मिळाली. सध्या सोशल मीडियावर या रोबोटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
'निला' रोबोटकडून मतदारांचे स्वागत
माहितीनुसार, हा रोबोट मतदारांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तैनात करण्यात आला होता. कोइंबतूर येथील 'रोबो मिरर' कंपनीने हा रोबोट विकसित केला आहे.
'रोबो मिरर’ कंपनीतील कौशिक यांनी सांगितले की, "या रोबोटचे नाव 'निला' आहे. हा इव्हेंट-बेस्ड रोबोट असून लग्न, अधिकृत कार्यक्रम आणि निवडणुका अशा विविध प्रसंगी याचा वापर करता येऊ शकतो. यामध्ये व्हॉइस फीचर आहे, ज्यामुळे तो स्वतः बोलू शकतो. आम्ही कमांड दिल्यावर तो आसपासच्या लोकांशी संवाद साधतो आणि येथे मतदारांचे स्वागत करत आहे. आपण कमांड देणार त्या भाषेत तो संवाद साधू शकतो."
इंग्रजी आणि तमिळमध्ये संवाद
व्हायरल व्हिडीओनुसार, 'निला' रोबोट इंग्रजी आणि तमिळ भाषेत बोलताना दिसला. ज्यामुळे मतदारांचे विशेष लक्ष वेधले गेले. मतदान केंद्रावर आलेल्या नागरिकांसाठी हा अनुभव वेगळाच ठरला.
मतदानासाठी पंतप्रधानांचे आवाहन
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करत नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. "पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्व मतदारांनी विक्रमी संख्येने मतदान करावे. विशेषतः युवक आणि महिला मतदारांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी पुढे यावे."
मतदारसंख्या आणि निकाल
पुदुच्चेरीमध्ये एकूण सुमारे ९.५ लाख पात्र मतदार आहेत. त्यामध्ये १८ ते १९ वयोगटातील २४,१५६ प्रथमच मतदान करणारे मतदार आहेत, तर ८५ वर्षांवरील ६,०३४ ज्येष्ठ मतदार आहेत. या निवडणुकीत ३० सदस्यीय विधानसभेची रचना निश्चित होणार असून निकाल ४ मे रोजी जाहीर होणार आहेत.