पंजाबच्या तरन तारण जिल्ह्यातील उस्मा लॉ कॉलेजमध्ये सोमवारी (दि.९) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. कॉलेजच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वर्गातच एका विद्यार्थिनीवर गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना वर्गातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आरोपी गंभीर जखमी
सीसीटीव्ही फुटेजनुसार, सकाळी सुमारे ९.१७ वाजता आरोपी अभिराज सिंग उर्फ प्रिन्स राज वर्गात प्रवेश करतो. काही क्षणांतच तो पिस्तूल काढून विद्यार्थिनी संदीप कौर हिच्या डोक्यात गोळी झाडतो. यात तिचा जागीच मृत्यू होतो. त्यानंतर काही सेकंदांतच आरोपी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडतो. हा प्रकार पाहून वर्गातील इतर विद्यार्थी घाबरून वर्गातून पळून जातात.
आरोपी विद्यार्थ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी
या घटनेबाबत माहिती देताना तरन तारणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुरेंद्र लांबा यांनी सांगितले की, दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे घटनेमागचे नेमके कारण शोधले जाणार आहे.
कॉलेज प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्न
दरम्यान, या घटनेमुळे मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. संदीप कौर ही नौशेरा पन्नुआन येथील रहिवासी होती. तिची आई हरजिंदर कौर या विधवा असून सात मुलींच्या कुटुंबाची जबाबदारी त्या एकट्याच सांभाळत होत्या. मुलीच्या मृत्यूनंतर त्यांनी कॉलेज प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पोलिसांचा सखोल तपास सुरू
या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडियावर हा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडल्याचे दावे केले जात असले, तरी पोलिसांनी याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी दिलेली नाही. पोलिसांनी वर्गातील विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली असून, खून आणि आत्महत्येच्या प्रयत्नामागील खरा हेतू शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे.