नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेला लाठीमार आणि पॅलेट गन वापराच्या आदेशांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे, तसेच पॅलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले, असे दोन थेट सवाल राहुल गांधी यांनी पत्रातून उपस्थित केले आहेत.
‘संसद चलो’ मोर्चादरम्यान २० जुलै रोजी जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार, पॅलेट गन आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला होता.
या घटनेनंतर राहुल गांधी यांनी रविवारी अमित शहा यांना पत्र पाठवून या कारवाईची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. पत्रात राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, विद्यार्थी निष्पक्ष आणि जबाबदार शिक्षण व्यवस्थेची मागणी करत शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. मात्र त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी सुरक्षा दलांनी अतिरेकी बळाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी पत्रात दावा केला आहे की, पोलिसांच्या लाठीमारामुळे शेकडो विद्यार्थी गंभीर जखमी झाले. विद्यार्थिनींनाही मारहाण करण्यात आली असून, त्यांच्याशी गैरवर्तन झाल्याचे आरोप आहेत. १९ वर्षीय विद्यार्थी साहिल लोचब याची भेट घेतल्याचे सांगत, पॅलेट गनच्या गोळीमुळे त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जाण्याची शक्यता असल्याचा उल्लेखही पत्रात केला आहे.
थेट सवाल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उद्देशून राहुल गांधी यांनी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. विद्यार्थ्यांविरोधात पॅलेट गनसारख्या घातक साधनांचा वापर करण्यास तुम्ही गृहमंत्री म्हणून मंजुरी दिली होती का? जर नाही, तर ही परवानगी कोणी दिली? साध्या वेशात विद्यार्थ्यांना लाठ्यांनी मारहाण करताना दिसणारे लोक पोलीस कर्मचारी होते की स्वयंसेवक?