दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी रेखा गुप्ता यांनी घेतली शपथ; 'हे' आहेत मंत्रिमंडळातील चेहरे FPJ
राष्ट्रीय

दिल्लीत 'महिलाराज'चा "चौकार"! रेखा गुप्ता यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; मंत्रिमंडळात 'या' ६ जणांची वर्णी

पहिल्यांदा आमदारपदी निवडून आल्यानंतर त्यांना थेट मुख्यमंत्री करण्यात आले आहे. त्या संघाच्या विचारसरणीच्या असून विद्यार्थी संघटनेपासून भाजपात कार्यरत आहेत. रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप लगेचच अॅक्शन मोडवर उतरण्याच्या तयारीत आहे.

Kkhushi Niramish

दिल्लीत आता पुन्हा महिलाराज सुरू झाले आहे. दिल्लीतील रामलीला मैदानात आज गुरुवारी (दि. २०) दुपारी १२.३० वाजता रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली आहे. राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. थोडक्यात, दिल्लीमध्ये 'महिलाराज'चा 'चौकार' बसलाय. विशेष म्हणजे पहिल्यांदा आमदारपदी निवडून आल्यानंतर त्यांना थेट मुख्यमंत्री करण्यात आले आहे.

दोन वेळा विधानसभेला पराभूत

रेखा गुप्ता यांचा २०१५ आणि २०२० ला विधानसभा निवडणूकीत पराभव झाला होता. २०१५ आणि २०२० मध्ये आपच्या वंदना कुमारी यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, यावेळी रेखा गुप्ता यांनी वंदना कुमारी यांचा २९ हजार ५९५ मतांनी पराभव केला.

रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास

रेखा गुप्ता संघाच्या विचारसरणीच्या असून विद्यार्थी संघटनेपासून भाजपात कार्यरत आहेत. दौलत राम कॉलेजच्या सचिवपदी १९९४-९५ ला त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर १९९५-९६ मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या सचिव होत्या, तर १९९६-९७ मध्ये दिल्ली विद्यापीठात छात्र संघाच्या त्या अध्यक्ष बनल्या. तर २००७ मध्ये त्या उत्तरी पीतमपुरा वार्डमधून भाजपच्या नगरसेवक झाल्या. त्यांची २०१० मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. सध्या रेखा गुप्ता ह्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. दिवंगत नेत्या सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी यांच्यानंतर गुप्ता या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील.

काय असणार आव्हाने?

भाजपने २७ वर्षानंतर दिल्लीत अभूतपूर्व यश मिळवले आहे. रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप लगेचच अॅक्शन मोडवर उतरण्याच्या तयारीत आहे. आज कॅबिनेटची पहिली बैठक असेल. त्यांच्यासमोर आता निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करणे प्रमुख असणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात पात्र लाभार्थी महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन केव्हा पूर्ण होणार याकडे दिल्लीच्या महिलांचे लक्ष लागले असणार आहे. याशिवाय दिल्लीत पायाभूत सुविधा उभारणे, यमुनेची स्वच्छता इत्यादी महत्त्वाची आव्हाने असणार आहेत.

या सहा जणांची मंत्रिमंडळात वर्णी

रेखा गुप्ता यांच्यासह प्रवेश वर्मा, मनजिंदर सिंह सिरसा, आशीष सूद, रविंद्र सिंह, पंकज सिंह आणि कपिल मिश्रा या सहा जणांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा, राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि अन्य नेतेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video