‘एस-४००’ ने ३१४ किमीवरील पाकिस्तानी विमान पाडले; संरक्षण खात्याच्या ताज्या अहवालात उघड संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

‘एस-४००’ ने ३१४ किमीवरील पाकिस्तानी विमान पाडले; संरक्षण खात्याच्या ताज्या अहवालात उघड

गेल्यावर्षी ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाच्या ‘एस-४००’ हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानच्या हद्दीत ३१४ किलोमीटर अंतरावर उड्डाण करणारे एक विमान पाडल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : गेल्यावर्षी ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय हवाई दलाच्या ‘एस-४००’ हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानच्या हद्दीत ३१४ किलोमीटर अंतरावर उड्डाण करणारे एक विमान पाडल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे.

अहवालानुसार, संघर्षादरम्यान पाकिस्तानने आपली हवाई हद्द खुली ठेवली होती आणि नागरी विमानांची वाहतूकही सुरू होती. त्यामुळे नागरी विमानांना लक्ष्य केले जाण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी लष्करी विमाने ओळखून त्यांना लक्ष्य केले.

अहवालात पाडलेल्या विमानाचा उल्लेख ‘स्पेशल मिशन एअरक्राफ्ट’ असा केला आहे. मात्र, भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी हे पाकिस्तानचे ‘ॲॅवॉक्स’ विमान असल्याचे सांगितले होते. हे विमान हवेत निर्माण होणारे धोके आणि लक्ष्य यांची एकाच वेळी ओळख करू शकते. त्यामुळे त्याला ‘हवाई कमांड सेंटर’ असेही म्हटले जाते.

अहवालानुसार, भारताकडून जमिनीवरून हवेत करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक लांब पल्ल्याचा हल्ला होता. यामुळे शत्रूचे विमान कितीही दूर असले तरी भारतीय हवाई संरक्षण प्रणालीपासून ते सुरक्षित राहू शकत नाही, हे स्पष्ट झाले.

प्रणालीने धोका ओळखून मार्गदर्शित क्षेपणास्त्र डागले

अहवालानुसार, एस-४०० प्रणालीने पाकिस्तानी विमानामुळे निर्माण झालेला धोका ओळखला. त्यानंतर लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राला लक्ष्याच्या दिशेने मार्गदर्शन करण्यात आले. या क्षेपणास्त्राने पाकिस्तानी विमानावर अचूक निशाणा साधला.

अशी आहे एस-४०० प्रणालीची ताकद

‘एस-४०० ट्रायम्फ’ ही रशियाची अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे. ही प्रणाली लढाऊ विमाने, बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे, ड्रोन तसेच स्टेल्थ विमाने यांसारख्या विविध हवाई धोक्यांचा सामना करण्यास सक्षम आहे. हवेतून येणाऱ्या विविध प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करणारी मजबूत ढाल म्हणून ‘एस-४००’ प्रणाली काम करते. जगातील अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक म्हणून तिची गणना केली जाते.

भारताकडे तीन स्क्वॉड्रन

एस-४०० च्या एका स्क्वॉड्रनमध्ये २५६ क्षेपणास्त्रे असतात. भारताकडे सध्या एस-४०० च्या तीन स्क्वॉड्रन आहेत. या स्क्वॉड्रन देशाच्या वेगवेगळ्या सीमांवर तैनात करण्यात आल्या आहेत.

  • पहिली स्क्वॉड्रन : भारताला ‘एस-४००’ ची रशियाकडून २०२१ मध्ये मिळाली. ती पंजाबमध्ये तैनात केली आहे. पाकिस्तान आणि चीन या दोन्ही दिशांकडून निर्माण होणाऱ्या हवाई धोक्यांना रोखण्यासाठी तिचा वापर केला जातो.

  • दुसरी स्क्वॉड्रन : सिक्कीममध्ये तैनात केली आहे. ‘एस-४००’ ची दुसरी स्क्वॉड्रन चीनच्या सीमेलगत सिक्कीममध्ये तैनात आहे. भारताला ही खेप जुलै २०२२ मध्ये मिळाली. या ठिकाणाहून ‘चिकन नेक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिलीगुडी कॉरिडॉरवरही लक्ष ठेवले जाते.

  • तिसरी स्क्वॉड्रन : पश्चिम सीमेवर तैनात तिसरी स्क्वॉड्रन राजस्थान-गुजरात किंवा पंजाब-राजस्थान सीमाभागात तैनात करण्यात आली आहे. भारताला ही खेप फेब्रुवारी २०२३ मध्ये मिळाली. या स्क्वॉड्रनमुळे देशाच्या पश्चिम सीमेवरील हवाई संरक्षण अधिक मजबूत झाले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गणेशोत्सवास उत्साहात प्रारंभ; घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

Mumbai : लालबाग-परळमध्ये विशेष सज्जता; प्लास्टिक बाटल्यांसाठी सात ठिकाणी बास्केट

आजचे राशिभविष्य, १५ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

गौरी-गणपतीच्या नैवेद्यासाठी करा आलू मटारची भाजी; मोजक्या साहित्यात बनवा झटपट रेसिपी

Ganeshotsav 2026 : मोदकापासून पुरणपोळीपर्यंत; जाणून घ्या बाप्पाच्या नैवेद्यातील खास पदार्थ