नवी दिल्ली : जंतरमंतर हे पूर्वीचे आंदोलनस्थळ आता रद्द करण्यात आले असतानाही तो आदेश झुगारून तेथे घुसखोरी करीत निषेध आंदोलन केल्याच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेले 'कॉक्रोच जनता पक्षाचे' नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेचे आदेश विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी बुधवारी दिले.
या दोन्ही कार्यकर्त्यांची पूर्वीची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना सुनावणीसाठी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या कारवाईपूर्वी सीजेपीच्या कायदेशीर कामकाज प्रमुख रत्ना सिंग याही पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या.
कोठडीत केली होती वाढ
विशेष कार्यकारी दंडाधिकारी ऋतू राज यांनी सोमवारी या दोन्ही नेत्यांच्या वर्तनामुळे शांतता भंग होण्याची आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता व्यक्त करत त्यांची न्यायालयीन कोठडी २१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, या दोन्ही नेत्यांनी ११ ऑक्टोबर रोजी दक्षिण-पश्चिम जिल्ह्याच्या दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेले जातमुचलके मोडले होते आणि त्यानंतर सध्याच्या प्रकरणात शांततेचा भंग केला होता. तसेच, चौकशीदरम्यान पूर्वीचे जामीनदार अयोग्य आढळल्याने त्यांना नवीन जामीनदार देण्याचे आदेशही देण्यात आले होते.
सौरभ दास, आशुतोष रांका आणि सीजेपीचे सदस्य अजिंक्य शिंदे हे १३ ऑक्टोबर रोजी इतर १४ जणांसह जंतरमंतरवर खासगी जागेतून दाखल झाले होते आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता, असा आरोप आहे. हे सर्व सीजेपी सदस्य मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणातील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करत होते आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होतेकायद्याचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे आणि सुटकेनंतर ते पुन्हा नियम मोडून इतरांना भडकवण्याची शक्यता असल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांच्या सुटकेला तीव्र विरोध केला होता. मात्र, आता दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.
कोठडी वाढवण्याची पेली होती मागणी
गेल्या आठवडाभरापासून कोठडीत असलेल्या दास आणि रांका यांची न्यायालयीन कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे या दोघांना दिल्लीतील कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याची मागणी केली. मात्र सुनावणीनंतर न्यायालयाने दास आणि रांका यांच्या सुटकेचे आदेश दिले. त्यापूर्वी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या कोठडी वाढवण्याच्या निर्णयाविरोधात सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली.
दिल्ली उच्च न्यायालयाची भूमिका
तत्पूर्वी, दिवसभरात दिल्ली उच्च न्यायालयाने सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना त्यांच्या सुटकेची मागणी करणारी आणि दंडाधिकाऱ्यांच्या कोठडी वाढवण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका मागे घेण्याची परवानगी दिली होती. न्या. सुब्रह्मण्यम प्रसाद यांच्या एकलपीठाने दोन्ही कार्यकर्त्यांच्या वकिलांना याचिका मागे घेऊन दंडाधिकारी न्यायालयाच्या पुढील कार्यवाहीची प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला होता. दंडाधिकारी न्यायालयातून दिलासा मिळाल्यास उच्च न्यायालयातील कार्यवाही निष्फळ ठरेल, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले होते.
दीपके झाले भावूक
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पक्षाचे सह-संयोजक सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेचे स्वागत करताना त्यांच्याशी असलेली बांधिलकी व्यक्त केली. सणासुदीच्या काळात या दोन्ही नेत्यांना आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. दीपके म्हणाले, काही लोक माझ्या या भावूक होण्यावरून माझी टर उडवतील (ट्रोल करतील). पण माझ्या भावना हीच माझी ताकद आहे. मी हे करतो कारण ते दोघे माझे कुटुंब आहेत. मी त्यांची काळजी घेतो. हे त्यांच्यावरील माझ्या प्रेमाचे प्रतीक आहे."
फ्रान्स आंदोलनाचा दाखला
आंदोलनांसाठी पोलिसांची परवानगी घेणे केवळ आंदोलकांना रोखण्यासाठी नसते, तर त्या आंदोलनात बाहेरचे समाजकंटक घुसून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नयेत यासाठीही असते. दास आणि रांका यांच्या अटकेविरोधातील सुनावणीदरम्यान न्यायालयाने फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाचा आणि जाळपोळीचा दाखला दिला.