राष्ट्रीय

ज्येष्ठ पत्रकार मार्क टुली यांचे निधन

अनेक पुरस्कारप्राप्त पत्रकार असलेल्या टुली यांची प्रकृती काही काळापासून खालावलेली होती. त्यांना २१ जानेवारी रोजी साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेफ्रोलॉजी विभागाच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले होते.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचे सखोल कथन करणारे आणि ख्यातनाम लेखक व ज्येष्ठ पत्रकार मार्क टुली यांचे रविवारी येथे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे अवयव निकामी होत गेल्याने त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. ते ९० वर्षांचे होते. अनेक पुरस्कारप्राप्त पत्रकार असलेल्या टुली यांची प्रकृती काही काळापासून खालावलेली होती. त्यांना २१ जानेवारी रोजी साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेफ्रोलॉजी विभागाच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साकेत, अत्यंत दुःखाने विल्यम मार्क टुली यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती, आप्तस्वकीयांप्रती आणि त्यांच्या जाण्याने प्रभावित झालेल्या सर्वांप्रती आम्ही मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. 'ज्येष्ठ पत्रकार आणि टुली यांचे निकटवर्तीय मित्र सतीश जेकब यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

२४ ऑक्टोबर १९३५ रोजी कोलकाता येथे जन्मलेले टुली हे २२ वर्षे बीबीसी, नवी दिल्लीचे ब्युरो प्रमुख होते. ते ख्यातनाम लेखक होते. बीबीसी रेडिओ ४ वरील 'समथिंग अंडरस्टूड' या कार्यक्रमाचे सादरकर्तेही होते. भारत, ब्रिटिश राजपासून ते भारतीय रेल्वेपर्यंत विविध विषयांवरील अनेक माहितीपटांमध्ये त्यांचा सहभाग होता. २००२ मध्ये त्यांना 'नाइटहूड' प्रदान करण्यात आला, तर २००५ मध्ये भारत सरकारकडून त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

'नो फुल स्टॉप्स इन इंडिया', 'इंडिया इन स्लो मोशन' आणि 'द हार्ट ऑफ इंडिया' यांसह भारतावरील अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. बीबीसीसाठी केलेल्या त्यांच्या कार्याला स्वातंत्र्योत्तर भारतातील अनेक ऐतिहासिक घटनांच्या वार्तांकनाने विशेष ओळख मिळाली.१९७१ चे बांगलादेश युद्ध, १९७५-७७ ची आणीबाणी, १९७९ मध्ये पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जुल्फिकार अली भुट्टो यांची फाशी, ऑपरेशन ब्ल्यू स्टार, १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या व शीखविरोधी दंगली, १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या आणि १९९२ मध्ये बाबरी मशिदीचा पाडाव-या प्रमुख घटनांचा त्यांच्या वार्तांकनात समावेश होता.

'ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि पंजाब प्रश्न' हे टुली यांच्या पहिल्या पुस्तकाचे विषय होते. 'अमृतसरः मिसेस गांधी'ज लास्ट बॅटल' हे पुस्तक त्यांनी सतीश जेकब यांच्यासह सहलेखन केले होते.

इराणी युद्धनौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीचा हल्ला, ८७ ठार; श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात जहाजाला जलसमाधी

मुंबईसह राज्यभरात उन्हाचा चटका; थंडीने गाशा गुंडाळला; आणखी काही दिवस उष्णतेचा इशारा

एसटीच्या 'शिवनेरी' धावणार राज्यभरात; २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेसची खरेदी

व्हॉट्सॲप चॅटच्या आधारे घटस्फोट मंजूर होत नाही; नाशिकच्या कौटुंबिक कोर्टाचा आदेश रद्दबातल

Mumbai : फुटपाथवर यापुढे दुचाकींना नो एन्ट्री! ३८४ कोटी रुपये खर्चून रेलिंग्ज व बोलार्ड्स बसवणार