सिक्कीम : सिक्कीममध्ये मुसळधार आणि संततधार पावसामुळे गुरुवारी रात्री मोठे भूस्खलन झाले. ग्यालशिंग जिल्ह्यातील रिम्भी गावात डोंगरावरील माती आणि मलबा मोठ्या प्रमाणात खाली आला. ग्यालशिंग जिल्ह्यात असलेल्या रिम्भी गावात गुरुवारी रात्री सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याची घटना घडली. यात २० हून अधिक घरे आणि सरकारी निवासस्थाने वाहून गेली. मात्र, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
काही घरे भूस्खलनाच्या मार्गात असल्याने नागरिकांनी घरातील महत्त्वाचे सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी रिम्भीतील परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. प्रशासनाला अतिसतर्क राहण्याचे, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे निर्देश दिल्याचे तमांग यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पावसाशी संबंधित घटनांनंतर प्रशासनाने विविध भागांमध्ये नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले आहे. भूस्खलन, रस्ते बंद होणे, चिखल-मलब्याचा प्रवाह आणि घरांचे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली.
लुइंग-रांका महामार्गावरील बोजोघारी, लोअर बोजोघारी, लिंगडिंग, हायकोर्ट रोड, टीएनए गेट, व्हीआयपी कॉलनी, अपर झेड-बोजोघारी, पांगथांग-लिंगडोक रोड, पामरो गाव, लिंग पेरबिंग, अपर आणि मिडल लुइंग, फेन्झोंग, रांका, रकडोंग तिनटेक, दारागाव अपर बर्टुक, सिचे आणि अरिथांग या भागांची पाहणी करण्यात आली.
काही रस्ते अद्याप मलब्यामुळे बंद असून वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सिचे येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचेही नुकसान झाले आहे. एन्चे शाळेजवळील ३३/११ केव्ही स्विचिंग स्टेशनजवळ साचलेला मलबा संभाव्य धोकादायक ठरू शकतो.
आणखी मोठ्या भूस्खलनाची भीती
संततधार पावसामुळे डोंगराच्या उतारावरील माती सैल झाली आहे. त्यामुळे आणखी मोठे भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने स्थानिकांमध्ये भीती आहे. भूस्खलनाच्या मार्गात असलेल्या घरांमधील नागरिक विशेष खबरदारी घेत आहेत. भूस्खलनामुळे काही रस्त्यांवर चिखल आणि मलबा साचला असून प्रादेशिक वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पावसाचा जोर वाढल्यास परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.