सोशल मीडियावर सध्या सोया चाप तयार करण्याचा एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका कारखान्यात सोया चाप तयार करताना एक अर्धनग्न तरुण पिठाच्या मिश्रणात लोळत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतं?
व्हायरल व्हिडिओमध्ये काही कामगार एका मोठ्या जागेत सोया चापचे मिश्रण तयार करताना दिसतात. याचवेळी एक अर्धनग्न तरुण त्या मिश्रणावर लोळत असल्याचे दिसते. इतर कामगार त्याला ओढताना तसेच त्याच्यावर पाणी टाकताना दिसतात. परिसरही अस्वच्छ असल्याचे व्हिडिओत दिसत असून, अनेक कामगार अनवाणी फिरताना दिसत आहेत.
या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
नोएडातील कारखान्याचा दावा; मात्र अधिकृत पुष्टी नाही
सोशल मीडियावर हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील नोएडाच्या सेक्टर २७ मधील सोया चाप तयार करणाऱ्या कारखान्यातील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबत कोणत्याही सरकारी यंत्रणेने किंवा प्रशासनाने अधिकृत पुष्टी केलेली नाही.
काही माध्यमांच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ नवीन नसून तो आग्रा येथील एका जुन्या घटनेचा असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नेमका कुठे आणि कधी चित्रित करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोशल मीडियावर संताप
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत संबंधित यंत्रणांनी चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, या व्हिडिओच्या सत्यतेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याने, व्हायरल दाव्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहितीची प्रतीक्षा करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.