नवी दिल्ली : आगामी ‘सुपर एल निनो’च्या पहिल्या टप्प्यात जगभरात तीव्र उष्णतेमुळे तब्बल ४ लाख ५० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिकागो विद्यापीठाच्या ‘क्लायमेट इम्पॅक्ट लॅब’च्या संशोधकांनी बुधवारी जाहीर केलेल्या अहवालात हा धक्कादायक इशारा देण्यात आला आहे.
या अहवालानुसार, भीषण ‘अल निनो’मुळे २०२७ च्या मध्यापर्यंत भूभागाचे तापमान सरासरीपेक्षा सुमारे १.२ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या अंदाजानुसार, सप्टेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या काळात जगभरात २ लाख ३९ हजार लोकांचा उष्णतेमुळे मृत्यू होऊ शकतो. यातील बहुतांश मृत्यू हे ‘ग्लोबल साउथ’मधील देशांमध्ये होतील, जेथे तापमान वेगाने वाढण्याची शक्यता आहे. तसेच १९९६ ते २०२५ या कालावधीच्या तुलनेत अत्यंत उष्ण दिवसांच्या संख्येत ४४ टक्क्यांनी वाढ होणार आहे.
सर्वाधिक जीवितहानी आफ्रिकेच्या साहेल भागात
‘क्लायमेट इम्पॅक्ट लॅब’चे सहसंस्थापक मायकेल ग्रीनस्टोन यांनी सांगितले की, ‘ या उष्णतेचा पिकांवर होणारा परिणामांबाबत आपण आधीपासूनच स्पष्टपणे सांगू शकत होतो, मात्र आता मानवी मृत्यूंसारख्या गंभीर परिणामांचा अंदाज लावणेही शक्य झाले आहे. सर्वाधिक जीवितहानी आफ्रिकेतील साहेल भागात होण्याचा अंदाज असून तेथे ६६,८०० अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात. तसेच व्हिएतनाम, थायलंड, कंबोडिया आणि फिलीपिन्स या आशियाई देशांमध्ये १९,०० हून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज आहे’.
जगभरातील पर्जन्यमान, तापमानावर परिणाम
संशोधकांच्या मते, ‘सुपर एल निनो’ काळातील तापमानवाढ ही आगामी दोन दशकांमध्ये हवामान बदलामुळे अपेक्षित असलेल्या उष्णतेसारखी असेल. ‘एल निनो-सदर्न ऑसिलेशन’ ही प्रशांत महासागरातील व्यापारी वारे आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातील बदलांशी संबंधित हवामान प्रणाली आहे. तिचा परिणाम जगभरातील पर्जन्यमान, तापमान आणि वादळी हवामानावर होतो. आशियात ‘एल निनो’चा संबंध सामान्यतः कमकुवत मान्सून, दुष्काळ आणि वाढलेल्या तापमानाशी जोडला जातो.
उष्णतेशी लढण्यासाठी तयारीची गरज
‘क्लायमेट इम्पॅक्ट लॅब’च्या संशोधकांनी पूर्वसूचना प्रणाली, हीट ॲॅक्शन प्लॅन, शीतकरण केंद्रांची उपलब्धता, प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विस्तार आणि बाहेर काम करणाऱ्या कामगारांसाठी उष्णतेनुसार कामाच्या वेळांचे नियोजन करण्याची गरज व्यक्त केली आहे. संशोधकांच्या मते, हा एल निनो भविष्यातील अधिक उष्ण जगाचा ‘आगाऊ संकेत’ ठरू शकतो. त्यामुळे विविध प्रदेशांमध्ये उष्णतेमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना प्रभावी ठरतात, याचा अधिक तपशीलवार आणि सातत्याने अद्ययावत अभ्यास करणे आवश्यक आहे.
भारतात १५,८०० अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज
अहवालातील अभ्यासानुसार, भारतालाही एल निनोचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. भारतामध्ये पुढील सहा महिन्यांत सुमारे १५,८०० जणांचा अतिरिक्त उष्णतेमुळे मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतात डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सर्वाधिक जीवितहानी होण्याची शक्यता आहे. नायजेरिया, सुदान, इंडोनेशिया आणि भारत या देशांमध्ये उष्णतेशी संबंधित अतिरिक्त मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक राहण्याची शक्यता अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये सुमारे १३ हजार अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज आहे.