सुरत : एका मोबाईलवरून झालेला वाद थेट वडिलांच्या जिवावर बेतला. घरकाम करण्याऐवजी मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलीला वडिलांनी ओरडलं आणि तिचा फोन जमिनीवर आपटला. मात्र, याचा मुलीला इतका राग आला की तिने वडिलांवरच जीवघेणा हल्ला केला. संतापलेल्या २२ वर्षीय मुलीने कुकरच्या झाकणाने वडिलांच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर चाकूने त्यांच्या पोटावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला. गुजरातमधील सुरत येथे शनिवारी (३१ ऑक्टोबर) रात्री ही धक्कादायक घटना घडली असून, पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे.
घरकाम आणि मोबाईलवरून वडील-मुलीमध्ये वाद
'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सुरतमधील कोसाड परिसरात घडली. रमेशसिंह कैलाशसिंह राजपूत हे पत्नी मंजूबेन आणि मुलगी काजल (२२) यांच्यासोबत राहत होते. काजल मोबाईलवर अधिक वेळ घालवत असल्याने घरकामाकडे दुर्लक्ष करत होती. याबाबत तिच्या आईने वडिलांकडे तक्रार केली होती. त्यानंतर रमेशसिंह यांनी काजलला मोबाईल बाजूला ठेवून आईला घरकामात मदत करण्यास सांगितलं. मात्र, यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्याने रमेशसिंह यांनी काजलच्या हातातून मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटला. यामुळे काजल संतापली.
कुकरच्या झाकणाने हल्ला, चाकूने वार
संतापलेल्या काजलने स्वयंपाकघरातील कुकरचं झाकण उचलून वडिलांच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर तिने चाकूने त्यांच्या पोटावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात रमेशसिंह गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत ते घराबाहेरील ओट्याच्या दिशेने गेले. मात्र, काही अंतरावरच कोसळले.
त्यांचा आरडाओरडा ऐकून पत्नी मंजूबेन धावत आल्या. त्यावेळी रमेशसिंह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी १०८ रुग्णवाहिका सेवेला फोन केला. वैद्यकीय तपासणीनंतर रमेशसिंह यांना मृत घोषित करण्यात आलं.
आईच्या तक्रारीवरून मुलीला अटक
या घटनेनंतर रमेशसिंह यांच्या पत्नी मंजूबेन यांनी अमरोली पोलीस ठाण्यात मुलीविरोधात हत्येची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी काजलला अटक केली असून, तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सुरतचे सहाय्यक पोलीस आयुक्त पार्थ चोवाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरकामावरून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला होता. या वादातून मुलीने वडिलांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.