Video : इंजिन नाही, चालक नाही, तरीही तब्बल ६ किमी धावले रेल्वेचे ७ डबे; गेटकीपरमुळे टळला मोठा अनर्थ, बंगळुरू-चेन्नई रेल्वेसेवा विस्कळीत (X - व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
राष्ट्रीय

Video : इंजिन नाही, चालक नाही, तरीही तब्बल ६ किमी धावले रेल्वेचे ७ डबे; गेटकीपरमुळे टळला मोठा अनर्थ, बंगळुरू-चेन्नई रेल्वेसेवा विस्कळीत

वेग वाढत गेल्याने हे डबे यार्डाची हद्द ओलांडून जवळपास सहा किलोमीटर अंतरापर्यंत गेले. अखेर...

किशोरी घायवट-उबाळे

तामिळनाडू : रेल्वे यार्डात उभे असलेले सात रिकामे डबे अचानक इंजिनाशिवाय धावल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील तिरुपत्तूर जिल्ह्यात घडली आहे. जोलारपेट्टई रेल्वे जंक्शन येथून हे डबे जवळपास सहा किलोमीटर अंतरापर्यंत धावले. त्यानंतर थामलेरी मुथूरजवळ हे डबे रुळावरून घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे बंगळुरू-चेन्नई रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला असून, त्यामध्ये मालगाडीचे डबे इंजिनाशिवाय धावताना दिसत आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, जोलारपेट्टई रेल्वे जंक्शनमधील कोच मेंटेनन्स यार्डात दुरुस्तीच्या कामासाठी सात रिकामे डबे उभे करण्यात आले होते. एका इंजिनाच्या मदतीने हे डबे पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे डबे सुरक्षितपणे लॉक केले नाहीत किंवा त्यावर योग्य ते नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे हे डबे इंजिनपासून वेगळे होताच उताराच्या दिशेने आपोआप सरकू लागले. वेग वाढत गेल्याने हे डबे यार्डाची हद्द ओलांडून जवळपास सहा किलोमीटर अंतरापर्यंत गेले. अखेर थामलेरी मुथूरजवळ बंगळुरू-जोलारपेट्टई मुख्य रेल्वेमार्गावर ते रुळावरून घसरले.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये मालगाडीचे डबे कोणत्याही इंजिनाशिवाय रेल्वे रुळांवरून पुढे जात असल्याचे दिसत आहे. डबे सुरक्षित करण्याच्या प्रक्रियेत नेमकी कुठे चूक झाली, याबाबत चौकशी होण्याची शक्यता आहे.

गेटकीपरच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

डबे रुळावरून घसरताना झालेला मोठा आवाज कर्तव्यावर असलेल्या गेटकीपरच्या कानावर पडला. त्याने क्षणाचाही विलंब न करता रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बंगळुरूहून जोलारपेट्टईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेगाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. गेटकीपरने वेळीच माहिती दिल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

डबे हटवण्यासाठी गॅस कटर आणि जेसीबीची मदत

घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुख्य रेल्वेमार्गावरून घसरलेले डबे हटवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. यावेळी डब्यांचे एकमेकांना जोडलेले भाग वेगळे करण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला. तसेच डबे रेल्वे रुळांपासून दूर करण्यासाठी जेसीबी यंत्रसामग्रीची मदत घेण्यात आली. या कामामुळे रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी काही वेळ लागला.

बंगळुरू-चेन्नई रेल्वे वाहतुकीवर परिणाम

या घटनेचा बंगळुरू आणि चेन्नईदरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला. संभाव्य धडक टाळण्यासाठी काही गाड्या विविध ठिकाणी थांबवण्यात आल्या. त्यामुळे नियोजित रेल्वेसेवांना विलंब झाला असून प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागला.

जोलारपेट्टई रेल्वे जंक्शन हे दक्षिण भारतातील महत्त्वाचे रेल्वे केंद्र आहे. या घटनेमुळे रेल्वे यार्डातील सुरक्षा व्यवस्था, डब्यांची देखभाल आणि कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दुरुस्तीसाठी उभे केलेले डबे सुरक्षित ठेवण्यात नेमकी कुठे चूक झाली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'मुरासू' चक्रीवादळाचा धोका वाढला; चेन्नईत शाळा-कॉलेजला सुट्टी; आंध्रला रेड अलर्ट, महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

Thane : येऊरमध्ये ‘हॅलोविन पार्टी’वर पोलिसांची धाड; ७० हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित, मद्यपान आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर

Mumbai : सहा मजली इमारत, सांस्कृतिक दालन, व्यायामशाळा, प्रशस्त सभागृह; नवीन पालिका सभागृहात आसन क्षमता १०० ने वाढणार

भारताची पहिली बुलेट ट्रेन आकाराला येतेय; ५५७ प्रवासी क्षमता; ताशी २४९ किमी वेग, बेंगळुरूच्या कारखान्यात बीईएमएलकडून ८ डब्यांची ट्रेन

Pankaja Munde Ramp Walk : मंत्री पंकजा मुंडेंचा हटके अंदाज; हॅण्डलूम साडीतील रॅम्प वॉक चर्चेत, Video