नवी मुंबई

...अन् मुख्यमंत्रीही झाले विद्यार्थी; ५जी तंत्रज्ञानाच्या शुभारंभप्रसंगी विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी देशव्यापी फाइव्ह जी तंत्रज्ञानाचा शुभारंभ झाला.

प्रतिनिधी

५जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्चीऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी फाइव्ह जीचे महत्त्व सांगितले. क्रांतिकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बँकिंग यासह सर्वच क्षेत्रात फाइव्ह जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी देशव्यापी फाइव्ह जी तंत्रज्ञानाचा शुभारंभ झाला. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरूमसाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठमधील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी खुर्चीऐवजी बेंचची बसण्यासाठी निवड केली. मीही तुमच्या सोबत आज विद्यार्थी झाल्याचे मुख्यंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून पनवेलच्या शाळेची निवड झाली, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच पंतप्रधानांचेही आभार मानले. या नवीन तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल दृष्यांच्या माध्यमातून विषय समजण्यास अधिक सोपे होईल आणि शाळेचे वर्ग सामान्य वर्गवारीत न राहता ते स्मार्ट क्लास होतील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी गृहरक्षक दल-नागरी संरक्षणाचे अप्पर पोलीस महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी फाइव्ह जी तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना सहज सोप्या शब्दात समजेल, अशी माहिती दिली. यावेळी सादरीकरण करताना सिंग यांनी टेलिकॉम तंत्रज्ञानाचा ‘वन जी ते फाइव्ह जी’ असा प्रवास चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगितला. मोबाइलचा वापर स्वत:च्या सुरक्षेसाठी करा, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा देशाच्या आणि स्वत:च्या चांगल्यासाठी करा, असे आवाहनही सिंग यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.

सर्वच क्षेत्रात होणार क्रांती - मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, “या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्याचा फायदा सर्वाधिक शिक्षण क्षेत्राला होणार असून, याचा उपयोग विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होईल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. “इंटरनेटला मिळणाऱ्या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा गेम आणि सिनेमे डाउनलोड करण्यासाठी नाही,” असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले