नवी मुंबई

नवी मुंबई जागतिक हवाई नकाशावर; अबूधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानाचे ऐतिहासिक आगमन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने बुधवारी आपल्या इतिहासातील आणखी एक सुवर्णक्षण अनुभवला. अबूधाबीहून आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे IX-२०८ हे पहिले नियोजित आंतरराष्ट्रीय विमान सकाळी १०.२० वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वीरित्या उतरले.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने बुधवारी आपल्या इतिहासातील आणखी एक सुवर्णक्षण अनुभवला. अबूधाबीहून आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे IX-२०८ हे पहिले नियोजित आंतरराष्ट्रीय विमान सकाळी १०.२० वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वीरित्या उतरले. या ऐतिहासिक आगमनानिमित्त विमानाला पारंपरिक 'वॉटर कॅनन सलामी' देत भव्य स्वागत करण्यात आले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्यान्वयनाच्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. देशातील सर्वाधिक आधुनिक विमानतळांपैकी एक असलेल्या या विमानतळावर पहिले नियोजित आंतरराष्ट्रीय विमान उतरल्याने नवी मुंबईला जागतिक हवाई संपर्काचे नवे दालन खुले झाले आहे. अबूधाबी-नवी मुंबई हा हवाई मार्ग सुरू झाल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीसह मध्य पूर्वेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना, व्यावसायिकांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मुंबई विमानतळावरील वाढती प्रवासी

गर्दी कमी करण्यातही या विमानतळाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचे मानले जात आहे. प्रवाशांसाठी आधुनिक टर्मिनल, अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, जलद इमिग्रेशन प्रक्रिया आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर विमानतळ प्रशासनाने विशेष भर दिला आहे. आगामी काळात मध्य पूर्व, युरोप आणि आग्नेय आशियातील विविध शहरांसाठी आणखी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा मार्ग या ऐतिहासिक उड्डाणामुळे मोकळा झाला असून, नवी मुंबई विमानतळ देशाच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून उदयास येण्याच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकत आहे.

आर्थिक विकासाला मोठी चालना

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या विमानतळामुळे नवी मुंबई, रायगड आणि मुंबई महानगर प्रदेशात उद्योग, व्यापार, पर्यटन, लॉजिस्टिक्स आणि रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः जेएनपीए बंदर, अटल सेतू आणि प्रस्तावित एअरोसिटी प्रकल्प यांच्याशी विमानतळाची प्रभावी जोडणी झाल्याने हा परिसर आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक आणि वाहतूक व्यवस्थेचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे.

'वॉटर कॅनन सलामी'

पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाच्या स्वागतासाठी विमानतळ प्रशासनाने विशेष व्यवस्था केली होती. विमान धावपट्टीवर दाखल होताच अग्निशमन दलाच्या वाहनांकडून पारंपरिक 'वॉटर कॅनन सलामी' देण्यात आली. त्यानंतर विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विमानतळ प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, एअर इंडिया एक्स्प्रेसचे प्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

थकीत वीजबिले माफ; शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा, दिवसा मिळणार १२ तास मोफत वीज

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका; आज होणार सुनावणी

बुलेट ट्रेनचा तात्पुरता पूल गेला वाहून; काम रखडणार

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! डंपरला भरधाव कारची धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

एकनाथ शिंदे यांनी घेतली अमित शहांची भेट