मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या’ टर्मिनल १ च्या पुनर्विकासासाठी जागा मोकळी करण्यासाठी आणि दुहेरी विमानतळ प्रणालीचा मार्ग सुकर करण्यासाठी इंडिगो आणि एअर इंडिया समूह डिसेंबरपासून मुंबईच्या विद्यमान विमानतळावरील विमाने टप्प्याटप्प्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवणार आहेत.
२०२७ च्या उन्हाळी विमान वाहतूक हंगामापर्यंत टप्प्याटप्प्याने नियोजित केलेल्या या समन्वित स्थलांतरामुळे, विमान कंपन्यांना विमानतळामधील त्यांचे जुने ऑपरेटिंग स्लॉट राखून ठेवता येतील. तर काही निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवा नवी मुंबईत हलवल्या जातील, असे विमानतळ ऑपरेटर आणि एअरलाइन्सने जाहीर केले.
एअर इंडिया समूहाने म्हटले आहे की, ते जेद्दा, रियाध, दम्मम, दोहा, मस्कत आणि शारजाहसाठीच्या एअर इंडिया एक्सप्रेस सेवा एनएमआयएकडे टप्प्याटप्प्याने वळवतील आणि आयएटीए उत्तर उन्हाळा २०२७ च्या हंगामापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.
विमानतळ ऑपरेटरसोबत सुरू असलेल्या सहकार्यात्मक संवादाचा हा परिणाम आहे आणि भारतीय व आंतरराष्ट्रीय एअरलाइन्ससाठीच्या व्यापक विमानतळ संक्रमण कार्यक्रमाशी सुसंगत आहे. यामुळे सीएसएमआयए टर्मिनल १ च्या दीर्घ प्रतिक्षित पुनर्विकासास मदत होईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने होणारे हे स्थलांतर मुंबईच्या ड्युअल-एअरपोर्ट प्रणालीच्या विकासाला देखील पाठिंबा देते. तर एअर इंडिया समूहाला बाजाराची कार्यक्षमतेने सेवा देणे सुरू ठेवण्यास आणि सीएसएमआयएवरील त्यांच्या विद्यमान ऑपरेटिंग स्लॉट्सचे जतन करण्यास सक्षम करते, असे म्हटले आहे.
सीएसएमआयए आणि एनएमआयए दोन्ही ठिकाणांहून उड्डाण केल्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी मजबूत होईल, प्रवाशांना अधिक पर्याय आणि सोय उपलब्ध होईल आणि या प्रदेशातील विमान वाहतूक पायाभूत सुविधांच्या सततच्या विकासाला हातभार लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने एनएमआयएमधून ऑपरेशन्स सुरू करण्याच्या एअर इंडिया समूहाच्या योजनांचे स्वागत केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रदेशाच्या भविष्यातील विमान वाहतूक वाढीस समर्थन देण्यासाठी आणि अखंड प्रवासाचा अनुभव देण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी आणि स्केलेबल इन्फ्रास्ट्रक्चरसह विकसित केले जात आहे, असे म्हटले आहे.
नवीन विमानतळावर आंतरराष्ट्रीय ट्रान्सफर सुलभ करण्यासाठी इंडिगो देशांतर्गत कनेक्टिव्हिटीदेखील इथे आणेल. एअरलाईन आणि अदानी एअरपोर्ट्स ऑपरेशनल प्लॅनिंगच्या अंतिम टप्प्यात आहेत. यामध्ये अंतिम संक्रमण तारखा प्रकल्प समन्वय आणि ऑपरेटिंग मंजुरीच्या अधीन आहेत.
इंडिगोची १२ दैनिक उड्डाणे एनएमआयएवरून
मुंबईतील दोन्ही विमानतळांचे संचालन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि एअरलाइन्स यांच्यात १८ महिने चाललेल्या चर्चांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विमानतळावरील क्षमतेचा ताण कमी होण्यास मदत होईल आणि वाढत्या हवाई वाहतुकीचे व्यवस्थापन करणे सोपे होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.