आखाती युद्धाचा फटका आता शेतकऱ्यांनाही; JNPT त अडकले शेकडो कंटेनर; दुबई बाजारपेठ बंद असल्याने केळी, कांद्याची निर्यात ठप्प  
नवी मुंबई

आखाती युद्धाचा फटका आता शेतकऱ्यांनाही; JNPT त अडकले शेकडो कंटेनर; दुबई बाजारपेठ बंद असल्याने केळी, कांद्याची निर्यात ठप्प

आखाती युद्धात या भागातील अनेक देश ओढले गेल्याने या युद्धाचा फटका आता शेतकऱ्यांनाही बसू लागला आहे. नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या सर्वात मोठ्या बंदरात निर्यातीसाठी सज्ज असलेले १५०हून अधिक कंटेनर अडकून पडले आहेत. लाखो टन नाशवंत कांदा बंदर परिसरात अडकला असल्याने तो खराब होण्याची भीती निर्यातदार आणि शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Swapnil S

नवी मुंबई : आखाती युद्धात या भागातील अनेक देश ओढले गेल्याने या युद्धाचा फटका आता शेतकऱ्यांनाही बसू लागला आहे. नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या सर्वात मोठ्या बंदरात निर्यातीसाठी सज्ज असलेले १५०हून अधिक कंटेनर अडकून पडले आहेत. लाखो टन नाशवंत कांदा बंदर परिसरात अडकला असल्याने तो खराब होण्याची भीती निर्यातदार आणि शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, तणावामुळे दुबई येथील प्रमुख आयात बाजारपेठ तात्पुरती बंद करण्यात आल्याने भारतीय शेतमालाची निर्यात थांबली आहे.

दुबई ही भारतीय कांद्याची प्रमुख निर्यात बाजारपेठ मानली जाते. विशेषतः नाशिक पट्ट्यातील कांदा मोठ्या प्रमाणावर आखाती देशांकडे पाठविला जातो. मात्र, सध्या जहाज वाहतूक, विमा प्रक्रिया आणि आयात व्यवहारांवर परिणाम झाल्याने माल स्वीकारण्यास दुबईतील व्यापारी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. निर्यात प्रक्रियेत अनिश्चितता निर्माण झाल्याने व्यापारी आणि शेतकरी दोघांचेही आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे.

दरम्यान, देशांतर्गत बाजारात कांद्याच्या दरांवर तीव्र दबाव निर्माण झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) येथील २ मार्च २०२६ रोजीच्या दरपत्रकानुसार कांद्याचे दर प्रतिकिलो २ ते १३ रुपयांदरम्यान नोंदवले गेले. उत्तम प्रतीच्या ‘गोळा’ कांद्याला १२ ते १३ रुपये किलो दर मिळाला, तर मध्यम प्रतीच्या पत्ती कांद्याला ८ ते ११ रुपये किलो भाव मिळाला. खालच्या प्रतीच्या ‘बिनापत्ती (सुका)’ कांद्याचा दर ४ ते ५ रुपये किलो आणि ‘बिनापत्ती (ओला)’ कांद्याचा दर २ ते ३ रुपये किलो इतका घसरला आहे.

कांद्याचे हे दर पाहता उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि पॅकिंग खर्च वजा करता शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नसल्याची परिस्थिती आहे. निर्यात बंद झाल्यामुळे स्थानिक बाजारात आवक वाढली असून पुरवठा जास्त आणि मागणी मर्यादित अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दर आणखी घसरण्याची भीती व्यापारी व्यक्त करीत आहेत.

सरकारने हस्तक्षेप करण्याची शेतकऱ्यांची मागणी

आखाती युद्धाचा परिणाम केवळ सीमांपुरता मर्यादित न राहता तो थेट शेतकऱ्यांच्या शिवारात पोहोचल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. दुबई बाजारपेठ पुन्हा सुरू होईपर्यंत अनिश्चिततेचे सावट कायम राहणार असून केंद्र व राज्य सरकारने तातडीने पर्यायी निर्यात बाजारपेठा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच दर स्थिर ठेवण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, रमजान महिना सुरू असल्याने या महिन्यात मागणी असलेले खजूर आणि बदाम आयात होत नसल्याने त्याचेही दर भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Ratnagiri : रघुवीर घाटात दरड कोसळली; एसटी बस घाटातच अडकली, १५ ते २० गावांचा संपर्क तुटला, Video

ठाण्यात उद्या ‘थर’थराट; दहीहंडीनिमित्त ठाण्यात कडेकोट बंदोबस्त, २३०७ पोलीस तैनात

Dombivli : एटीएम कार्डची चोरी करून रोकड काढली; दोघांना अटक

राज्याच्या 'विधि व न्याय' विभागाच्या सचिवांना HC चा दणका; बजावली अवमान नोटीस, माफीनामाही फेटाळला

Raigad : अट्टल केमिकल तस्कर अश्रफ खान अटकेत; टँकरमधून केमिकल चोरून ड्रममध्ये भरणारे ताब्यात