नवी मुंबई : अमली पदार्थ खरेदी-विक्री प्रकरणातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकावर आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उलवा परिसरात घडली. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी तसेच त्यांच्या सोबत असलेले पोलीस मित्र जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असला तरी अद्याप संशयितांना अटक झालेली नाही.
शनिवारी रात्री मुंबई पोलीस दलातील अमली पदार्थ विरोधी पथक संशयित आरोपींच्या शोधार्थ उलवा सेक्टर १९ येथील शगुन चौक परिसरात दाखल झाले होते. त्या ठिकाणी काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधितांनी अचानक पथकावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी चॉपर, तलवार, हॉकीस्टिक, फायटर पंच तसेच गावठी कट्ट्याचा वापर केल्याचे समोर आले आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पोलीस पथकाला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली.
या हल्ल्यात मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे तसेच पोलीस मित्र फिरोज सिद्दीकी, अहमद रजा कुरेशी आणि अतुल जैस्वाल हे जखमी झाले आहेत.
स्थानिक पोलिसांना माहिती नव्हती
दुसऱ्या पोलीस आयुक्तालय किंवा जिल्हा क्षेत्रात कारवाई करताना संबंधित स्थानिक पोलिसांना माहिती देऊन त्यांच्या मदतीने कारवाई करण्याची पद्धत असते. मात्र, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात संशयितांना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना दिली नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे हल्लेखोरांना समोर आलेले पथक पोलीस असल्याची जाणीव नसल्याने त्यांनी प्रतिकार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे आंतरविभागीय समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.