नवी मुंबई : दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने आठही विभागांसाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक, टोल फ्री क्रमांक आणि आपत्कालीन विभागाचा क्रमांक जाहीर केला होता. मात्र, प्रत्यक्षात या तक्रार यंत्रणेचा फारसा उपयोग होत नसल्याचे समोर आले आहे. काही विभागांचे फोन बंद, तर काही ठिकाणी कर्मचारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारी आहेत. प्राप्त तक्रारींवर नेमकी काय कारवाई झाली, याबाबतही स्पष्टता नाही. विशेष म्हणजे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडेही फटाक्यांच्या प्रदूषणासंदर्भातील तक्रारी आणि गुन्ह्यांची एकत्रित आकडेवारी उपलब्ध नसल्याने प्रदूषण नियंत्रणाच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे होणारा त्रास आणि वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने विशेष तक्रार यंत्रणा कार्यान्वित केली होती. नियमबाह्य फटाक्यांची विक्री, निर्धारित वेळेचे उल्लंघन अथवा कर्णकर्कश आवाजामुळे त्रास होत असल्यास नागरिकांनी संबंधित विभागीय कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले होते.
मात्र, ८ आणि ९ नोव्हेंबर या दोन दिवसांतील तक्रारींचा आढावा घेतला असता, यंत्रणेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.
दिघा विभागात एकही तक्रार प्राप्त झाली नाही. घणसोली विभागात आठ, तर वाशी विभागात दोन तक्रारी नोंदविण्यात आल्या. नेरूळ विभागात ८ नोव्हेंबरच्या रात्री १० ते १२ तक्रारी प्राप्त झाल्या, तर बेलापूर विभागात दोन दिवसांत सुमारे २० ते २५ तक्रारी आल्या. दुसरीकडे, ऐरोली आणि तुर्भे विभागांच्या संपर्क क्रमांकांवर फोन उचलण्यात आले नाहीत, तर कोपरखैरणे विभागाचा क्रमांक बंद होता. त्यामुळे या विभागांतील तक्रारींची संख्या समजू शकली नाही.
तक्रार करायची कुठे?
महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे दोन दिवसांत केवळ दोन तक्रारी प्राप्त झाल्या. नेरुळ येथील एनआरआय कॉम्प्लेक्स आणि राजीव गांधी स्टेडियम परिसरातून प्रत्येकी एक तक्रार करण्यात आली होती.
काही विभागीय कार्यालयांकडून नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधण्याचा, तर काही ठिकाणी ११२ या आपत्कालीन क्रमांकावर तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे स्वतंत्र तक्रार यंत्रणेच्या उपयुक्ततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांकडेही आकडेवारी नाही!
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत फटाक्यांच्या प्रदूषणासंदर्भात किती तक्रारी प्राप्त झाल्या आणि किती गुन्हे दाखल झाले, याची एकत्रित आकडेवारी उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. अनेक अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीवर असल्याने माहिती संकलित झालेली नसल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एकीकडे फटाक्यांच्या धुराचा आणि आवाजाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असताना, दुसरीकडे तक्रार यंत्रणाच प्रभावीपणे कार्यरत नसल्याचे चित्र आहे. केवळ संपर्क क्रमांक जाहीर करून जबाबदारी संपत नाही, तर तक्रारींची नोंद घेऊन त्यावर तातडीने कारवाई करणेही आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.