नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर-३ येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून रिक्षाचालक गणेश पांडुरंग पारकर (५०) यांची बॅटने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे.
पारकर हे सेक्टर-३ परिसरात कुटुंबासह राहत होते. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास चिकणेश्वर गार्डनजवळ त्यांचा सावकार सावळे याच्याशी जुन्या वादातून संघर्ष झाला. यावेळी सावळे याने बॅटने पारकर यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर अन्य आरोपींनीही त्यांना मारहाण केली. गंभीर जखमी पारकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र ७ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी सावकार सावळे याच्यासह दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. तर बाळू सावळे (४२), सूरज गोडसे (३०), विनय मालवणकर (३०) आणि सचिन गुरुलिंग वेळजरंगी (३७) यांना १५ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथून अटक करण्यात आली. शिवीगाळ आणि दमदाटी हेच या घटनेमागील कारण असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी सांगितले.