नवी मुंबई

Navi Mumbai : तळोजात भरधाव कारने पादचाऱ्यांना चिरडले; एकाचा जागीच मृत्यू, पाच गंभीर, चालक फरार

तळोजा फेज-१ परिसरात मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास भरधाव कारने अनेक वाहनांना धडक दिली आणि वाटेत आलेल्या पादचाऱ्यांनाही चिरडले.

Swapnil S

नवी मुंबई : तळोजा फेज-१ परिसरात मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास भरधाव कारने अनेक वाहनांना धडक दिली आणि वाटेत आलेल्या पादचाऱ्यांनाही चिरडले. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातात अनेक वाहनांचे नुकसान झाले असून एका रिक्षाचा चेंदामेंदा झाला.    अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला असून तळोजा पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरू केला आहे.

या अपघातात नदीम खान (३७) याचा मृत्यू झाला. शराफुद्दीन शाकिर अली (४३), रामदुलारे रामसहाय गुप्ता (३७), सनी महेंद्र निषाद (३३), विघ्नेश संतोष पानसरे (१७) आणि मोहम्मद गुलफराज एमडी नसीम शेख (२८) हे पाच जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात इतर काही नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-४६-डीए-४८१४ क्रमांकाची कार मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास तळोजा फेज-१ येथील मिठास कॉर्नर परिसरातून भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने प्रथम दोन पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर कार चालकाने आणखी वेग वाढवत घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सदर कारने नदीम खान याला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अंदाधुंद ड्रायव्हिंग

एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतरही चालकाने कार न थांबता भरधाव वेगाने पुढे नेली. त्यातून या कारची रिक्षा आणि टेम्पोला जोरदार धडक बसली. नंतर या कारने रस्त्यालगत असलेल्या वडापाव सेंटरला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर चालक घटनास्थळी कार सोडून फरार झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

चालकाविरोधात गुन्हा दाखल; शोध घेण्यासाठी पथके रवाना

या अपघातात वडापाव सेंटरजवळ उभ्या असलेल्या अनेक नागरिकांना दुखापत झाली आहे. एकाच्या अंगावर गरम तेल पडल्याने तो किरकोळ भाजला, तर काही जणांच्या डोक्याला व पायांना दुखापती झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल केले. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी देखील घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. तळोजा पोलिसांनी या अपघातानंतर पळून गेलल्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा युद्धपातळीवर शोध सुरु केला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रविण भगत यांनी दिली.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Hit-and-Run : मिठीबाई कॉलेजजवळ भरधाव दुचाकीची १५ वर्षीय मुलीला धडक; चालक फरार, CCTV फुटेज व्हायरल

ऑटो एलपीजी वाहन वयोमर्यादा वाढवा; उद्योग संघटनेची केंद्र सरकारकडे मागणी

अपात्रतेचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्याला नाही! सहकारी बँक संचालक कालमर्यादेबाबत बँकतज्ज्ञांचे मत

तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, ९ कामगार जखमी, Video

सणासुदीत साखर कडू! दर ७० रुपये किलोवर, गूळही महागला; महिन्यात २० रुपयांनी वाढ, शेवया-बत्ताशांचे भावही वाढले