पनवेल : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला अनधिकृत जोडणी करून तब्बल ३९ लाख ८९ हजार ५८० रुपयांच्या पाण्याची चोरी झाल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. पनवेलमधील विचुंबे आणि देवदगाव हद्दीत एक्स्प्रेस-वेच्या बाजूला असलेल्या जलवाहिनीचे वॉशआऊट व्हॉल्व्ह तोडून ही चोरी करण्यात आली. याप्रकरणी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संतोष उनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाणीटंचाईच्या काळात अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने तैनात केलेल्या विशेष पथकाच्या तपासणीत ही बेकायदेशीर नळजोडणी निदर्शनास आली. अज्ञात आरोपींनी मुख्य वाहिनीवरून ३ लाख ३२ हजार ४६५ घनमीटर पाणी बेकायदेशीरपणे चोरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या चोरीमुळे संपूर्ण नवी मुंबई परिसराच्या पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला असून नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे.
खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणी निया फॅब्रिकेटर्सचे साई भिंगाडे, अल्ताफ शेख, एक अज्ञात व्यक्ती आणि कॉक्रीट मिक्सर वाहनाविरोधात भारतीय न्याय संहिता आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीस प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या बेकायदेशीर कृत्यात सहभागी असलेल्या संशयितांचा पोलीस कसून तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. विविध आरोपींनी बेकायदेशीर कृत्य केल्याने महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संतोष उनवणे यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.