नवी मुंबई

उरणच्या निसर्गाचा 'कंटेनर' घात; प्रशासकीय आशीर्वादाने पर्यावरणाची कत्तल, ग्रीन झोन नियमाला हरताळ

रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरण तालुक्यात सध्या विकासाच्या नावाखाली 'निसर्गसंहार' सुरू आहे. एकेकाळी घनदाट वनराई आणि डोंगरांनी वेढलेला हा तालुका आता सिमेंटच्या गोदामांचे आणि धुळीचे साम्राज्य बनला आहे.

Swapnil S

उरण : रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरण तालुक्यात सध्या विकासाच्या नावाखाली 'निसर्गसंहार' सुरू आहे. एकेकाळी घनदाट वनराई आणि डोंगरांनी वेढलेला हा तालुका आता सिमेंटच्या गोदामांचे आणि धुळीचे साम्राज्य बनला आहे. उरणमधील कंटेनर गोदामांच्या जाळ्याने पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढासळला असून, याला वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाचे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे.

उरणचा पश्चिम भाग यापूर्वीच पर्यावरणदृष्ट्या उद्ध्वस्त झाला असून आत्ता पश्चिम भागाचे वाळवंट होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून उरणचे तापमान कमालीचे वाढले असून ४० अंशाच्या वर पारा गेला आहे.

उरण पूर्व भागात सध्या जासई, चिर्ले, धुतूम, वेश्वी, दिघोडे, विंधणे, चिरनेर, मोठीजूई, कळंबुसरे, कोप्रोली, पिरकोन, सारडे, वशेणी या गावात डेब्रीजच्या स्वरूपातील विषारी कचऱ्याचा भराव सुरू आहे. या भरावांमुळे या भागातील जमीन प्रदूषित होणार आहे. या विषारी कचऱ्याच्या भरावाने नैसर्गिक पाण्याचे मार्ग बंद झाले असून भराव झाल्यामुळे यावर्षी पावसाळ्यात अनेक गावांना पुराचा तडाखा बसणार आहे.

सिडकोकडून जेव्हा एखाद्या कंटेनर यार्डला किंवा गोदामाला 'ना हरकत दाखला' दिला जातो, तेव्हा त्यामध्ये स्पष्ट अट असते की, 'प्रकल्पाच्या एकूण भूखंडापैकी किमान ३० टक्के जागा ही हरित पट्टा म्हणून राखून ठेवावी लागेल आणि तिथे वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे लागेल.' मात्र, उरणमधील परिस्थिती पाहिली तर एकाही गोदामात ५ टक्के झाडे दिसत नाहीत. उलट या जागेवर असलेली मोठमोठाली झाडे, वृक्ष तोडली जात आहेत. गोदामांच्या मालकांनी जास्तीत जास्त कंटेनर बसवण्यासाठी शेवटच्या इंचापर्यंत सिमेंटचे काँक्रीटीकरण केले आहे.

उरण तापण्याचे तांत्रिक कारण आहे 'अर्बन हिट आयलंड'. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, उरणमध्ये यंदा जे तापमान जाणवत आहे, त्याला 'हिट आयलंड इफेक्ट' कारणीभूत आहे. हजारो एकर जमिनीवर झाडे तोडून सिमेंटचे थर पसरवले गेले आहेत. हे सिमेंट दिवसा उष्णता शोषून घेते आणि रात्री ती बाहेर सोडते. पूर्वी झाडे आणि डोंगर वाऱ्याला थंडावा द्यायचे, आता केवळ पत्र्याचे शेड आणि कंटेनरचे लोखंड उन्हाने तापून हवेतील उष्णता वाढवत आहेत. त्यामुळे नैसर्गिक वातानुकूलन नष्ट झाले आहे.

तालुक्यातील महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि वनविभागाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. साध्या घरकुलासाठी किंवा रस्त्यासाठी वनविभाग आदिवासी बांधवांना कायद्याचा बडगा दाखवतो. मात्र, डोंगर पोखरून बनवलेल्या कंटेनर यार्डला अवजड वाहनांच्या येण्या जाण्यासाठी वनविभागाच्या हद्दीतून विनासायास रस्ते कसे मिळतात? अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी जेसीबी लावून हजारो जुनी झाडे जमीनदोस्त केली जात असताना वनरक्षक झोपेत असतात का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. उरण तालुक्यातील बहुतांश कंटेनर यार्ड, वेअर हाऊसेस गोदामांचे ट्रान्सपोर्ट, लेबर किंवा सिव्हिल कंत्राट हे स्थानिक नेत्यांच्या हातात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न उपस्थित करणे म्हणजे स्वतःच्या व्यवसायावर कुऱ्हाड मारण्यासारखे असल्याने राजकीय मंडळी मूग गिळून गप्प आहेत. दुसरीकडे, महसूल विभागाचे तलाठी आणि मंडळ अधिकारी कांदळवनांच्या जागेवर होत असलेल्या भरावाकडे 'कानाडोळा' करत असल्याने भूमाफियांचे धाडस वाढले आहे.

झाडे न लावणाऱ्या गोदामांचे परवाने रद्द करावेत

वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांनी यावर कडक भूमिका घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते खालील पावले उचलणे गरजेचे आहे. पर्यावरण विभाग सिडको, महसूल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्येक गोदामाचे सर्वेक्षण करून नियमानुसार वृक्षारोपण झाले आहे की नाही, याची तपासणी करावी. ज्या गोदामात झाडे नाहीत, त्यांचे परवाने तत्काळ रद्द करावेत किंवा त्यांना दिवसाला लाखांच्या घरात दंड ठोठावावा. परदेशी शोभेच्या झाडांऐवजी वड, पिंपळ, उंबर, चिंच आणि आंबा यांसारखी ऑक्सिजन देणारी झाडे लावण्याची सक्ती करावी. उरणच्या या 'वाळवंटीकरणाला रोखले नाही, तर पुढच्या पाच वर्षांत उरण राहण्यायोग्य राहणार नाही.

राजमा खाण्याचे फायदे माहीत आहेत का? पचनापासून स्नायूंच्या आरोग्यापर्यंत ठरतो उपयुक्त

PCOS Diet Tips : महिलांनो, PCOS मुळे त्रस्त आहात? सकाळी नाश्त्यात खा 'हे' ३ पदार्थ; जाणून घ्या फायदे

Skin Care Tips : पाठीवर हात फिरवताच बारीक पुळ्या जाणवतात? 'या' चुका करत असाल तर वाढू शकतो त्रास

नवरात्रीचा तिसरा दिवस अन् श्वेता शिंदेचा लाल पैठणीत खास साज; मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष

Breast Cancer : चाळिशीपूर्वीच स्तनाच्या कर्करोगाचा धोका; महिलांनी कोणती काळजी घ्यावी? तज्ज्ञ सांगतात...