८५ हजारांहून अधिक मतदारांची प्रपत्रे जमा झाली नाहीत; उरणमधील SIR मध्ये धक्कादायक वास्तव प्रातिनिधिक छायाचित्र
नवी मुंबई

८५ हजारांहून अधिक मतदारांची प्रपत्रे जमा झाली नाहीत; उरणमधील SIR मध्ये धक्कादायक वास्तव

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण उरण विधानसभा मतदारसंघात राबवण्यात येत असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (एसआयआर) मोहिमेतून धक्कादायक बाब समोर आली आहे.

राजकुमार भगत

उरण : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण उरण विधानसभा मतदारसंघात राबवण्यात येत असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (एसआयआर) मोहिमेतून धक्कादायक बाब समोर आली आहे. मतदारसंघातील तब्बल ८५ हजार १२८ मतदारांची ‘गणना प्रपत्र जमा न होणे’ (फॉर्म अनकलेक्टेबल) या प्रवर्गात नोंद झाली आहे. मतदारसंघातील एकूण ३ लाख ५७ हजार २५५ मतदारांच्या तुलनेत हे प्रमाण २३.३३ टक्के इतके मोठे असून, यामुळे स्थानिक प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मतदार याद्यांची अचूकता तपासण्यासाठी आणि दुबार, स्थलांतरित किंवा मृत मतदारांची नावे वगळण्यासाठी एसआयआर मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत उरण विधानसभा मतदारसंघातील ३५५ केंद्रांवर बीएलओंमार्फत घरोघरी जाऊन प्रपत्रे भरून घेण्याचे काम करण्यात आले. आकडेवारीनुसार, ३ लाख ५७ हजार २५५ मतदारांपैकी केवळ २ लाख ७२ हजार १२१ मतदारांचेच गणना प्रपत्र भरून स्वाक्षरीसह प्राप्त होऊ शकले आहेत.

प्राथमिक यादी २४ ऑगस्टला प्रसिद्ध करणार

उरणचे निवडणूक नायब तहसीलदार प्रभाकर नवाळे यांनी सांगितले की, बीएलओंच्या घरभेटींचा अहवाल आणि उपलब्ध डेटाच्या आधारे एसआयआर पूर्ण झालेल्या मतदारांची प्राथमिक यादी २४ ऑगस्ट रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीवर ज्या नागरिकांना काही आक्षेप, हरकती किंवा दावे दाखल करायचे असतील, त्यांच्यासाठी २३ सप्टेंबरपासून प्रक्रिया खुली केली जाईल. २३ सप्टेंबरपासून प्राप्त होणाऱ्या सर्व दावे व हरकतींची रीतसर छाननी करून आणि सुनावणी पूर्ण करून २७ ऑक्टोबर रोजी उरण मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

यादीकडे सर्वांचे लक्ष

उरण तालुक्यात औद्योगिकीकरण आणि नागरीकरण वेगाने होत असल्याने मोठ्या प्रमाणावर मतदारांचे स्थलांतर झाले असण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्राथमिक यादीकडे आणि त्यानंतर दाखल होणाऱ्या हरकतींकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Thane : पाणीप्रश्नावर ठेकेदारांची ‘मस्ती’; कामे अर्धवट ठेवणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी, नगरसेवकांचा सभागृहात संताप

महालक्ष्मी रेसकोर्सखाली भूमिगत पादचारी मार्ग; वरळीतील सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते सागरीकिनारा मार्गाच्या विहारपथापर्यंत जोडणी

Mumbai : चर्चगेट येथील मुलींच्या हॉस्टेलमधील पाणीटंचाईची हायकोर्टाकडून दखल; महापालिका आणि विद्यापीठाला नोटीस

Vasai : शासकीय ‘बसीन’ हे नाव बदलून ‘वसई’ करावे! वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांनी दिला नामकरणाचा प्रस्ताव

Mumbai : गणेश मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंगांचे वाटप; तीन हजार लिटर कलरचे वितरण