अर्थव्यवस्थेची भरभराट, राहुलचा जळफळाट 
संपादकीय

अर्थव्यवस्थेची भरभराट, राहुलचा जळफळाट

सरकारी बँकांनी सहा महिन्यांत मिळवलेला १.०९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी नफा, ३०० लाख कोटींच्या पुढे गेलेला व्यवसाय आणि १.६९ टक्क्यांपर्यंत खाली आलेले सकल बुडीत कर्जाचे प्रमाण हे भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी सकारात्मक चित्र दर्शवणारे महत्त्वाचे टप्पे आहेत.

नवशक्ती Web Desk

मत आमचेही

केशव उपाध्ये

सरकारी बँकांनी सहा महिन्यांत मिळवलेला १.०९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी नफा, ३०० लाख कोटींच्या पुढे गेलेला व्यवसाय आणि १.६९ टक्क्यांपर्यंत खाली आलेले सकल बुडीत कर्जाचे प्रमाण हे भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी सकारात्मक चित्र दर्शवणारे महत्त्वाचे टप्पे आहेत.

अमेरिकेसारख्या संपन्न, प्रगत देशातील (या संपन्न महाशक्तीचा बुडबुडा फुटू लागला आहे, हा भाग वेगळा) विद्यापीठे राहुल गांधींना विद्यापीठात व्याख्यान देण्यासाठी का बोलावतात असा प्रश्न वेताळाने विचारला तर त्याचे उत्तर विक्रमादित्यालाही देता येणार नाही. भारतात राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, विज्ञान- तंत्रज्ञान या विषयातील विद्वानांची मांदियाळी आहे. या विद्वानांमध्ये समतोल, निष्पक्ष मांडणी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. असे असताना व्यासंग, विद्वत्ता यापासून कोसो दूर असणाऱ्या राहुल गांधींना अमेरिकेतील नामवंत समजली जाणारी विद्यापीठे भाषणांसाठी का आमंत्रित करतात हे न सुटणारे कोडे आहे. ‘समान शिलेशु.....’ असं असेल तर विषय संपला, तर मुद्दा होता तो युवराज राहुल गांधींच्या अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात केलेल्या वक्तव्याचा. भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे, असे वक्तव्य राहुल गांधींनी कोलंबिया विद्यापीठात बोलताना केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या मेक इन इंडिया, स्टार्टअप यासारख्या उपक्रमांची खिल्ली उडवली. भारतीय अर्थव्यवस्था वाईट स्थितीत का आहे याचा तपशील त्यांनी दिला नाही. अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे अभ्यासू विश्लेषण करण्याची पात्रता त्यांच्या अंगी नाही. त्यामुळे त्यांच्याकडून ती अपेक्षाही नाही. कोणती अर्थव्यवस्था भक्कम आणि कोणती वाईट याच्या मोजमापाचे निकष राहुल गांधींना माहिती असण्याची शक्यता नाही. तसे प्रश्नही त्यांना विचारले जात नाहीत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारखी संस्था ७ टक्के दराने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज वर्तवित असताना तुम्ही भारतीय अर्थव्यवस्थेविषयी अशी प्रतिकूल टिप्पणी कशी करता, असा प्रतिप्रश्न त्यांना अमेरिकेत कोणीही केला नाही. असे प्रतिप्रश्न केले जाऊ नयेत अशी व्यवस्था कोलंबियासारख्या विद्यापीठांनी केली असावी का, हा वेगळा प्रश्न आहे. अमेरिकासारख्या महाशक्तीने राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार वाईट अर्थव्यवस्था असलेल्या देशावरील तेल खरेदी निर्बंध मागे का घेतले, असा प्रश्न अमेरिकेतील विद्वान राहुल गांधींना करणार नाहीत. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलवाहतुकीसमोर निर्माण झालेली आव्हाने असूनही भारताचा आर्थिक विकासदर ७ टक्के असणे याला मोठे महत्त्व आहे. असो! राहुल गांधींच्या या भाषणाच्या १८ दिवस आधी ऑक्टोबर २०२६ च्या वस्तू आणि सेवा कर संकलनाचा तपशील जाहीर झाला होता. ऑक्टोबर २०२६ मध्ये भारताचे जीएसटी संकलन २.३१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत म्हणजे ऑक्टोबर २०२५ पेक्षा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनातील वाढ २३ टक्के असून गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक वेगवान वाढ आहे. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये एप्रिलनंतर ऑक्टोबरमधील संकलन सर्वाधिक ठरले; एप्रिलमध्ये हे संकलन २.४३ लाख कोटी होते. एक वर्षापूर्वी म्हणजेच सप्टेंबर २०२५ मध्ये मोदी सरकारने जीएसटी दरकपात जाहीर करत देशभरात ५% आणि १८% असे दोन मुख्य टप्पे (स्लॅब) जाहीर केले. रोटी, पनीर, प्रक्रिया केलेले दूध यांसारख्या काही वस्तूंवर ०% कर, तर साबण, टुथपेस्ट, शाम्पू आणि इतर दैनंदिन वस्तूंवरील कर १८% वरून ५% इतका कमी केला गेला आहे, तर दुचाकी, तीनचाकी, बस, ट्रक, रुग्णवाहिका, ऑटो पार्ट्स, सिमेंटवरील वस्तू सेवा कर २८% वरून १८% पर्यंत कमी केला आहे. ही दरकपात होऊनही भारताच्या वस्तू-सेवा कर संकलनात गेल्या वर्षभरात सातत्याने वाढ नोंदवली जात आहे.

राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल तारे तोडत असतानाच भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीतील कामगिरीचा तपशील जाहीर झाला. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर २०२६) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एकत्रित निव्वळ नफा १.१० लाख कोटी रु. इतका नोंदवला गेला आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका काँग्रेसच्या कारकीर्दीत सरकारच्या खिरापत वाटपाचे अड्डे बनले होते. केंद्राच्या हस्तक्षेपामुळे या बँकांना कर्जाच्या खिरापती वाटाव्या लागत होत्या. मोदी सरकारने २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कारभारात मोठे बदल घडवून आणले आहेत. त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत ऐतिहासिक कामगिरी करीत एकत्रितपणे एक लाख नऊ हजार ५४० कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हा नफा तब्बल १६.९ टक्क्यांनी वाढला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा व्यवसाय ३०१.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात १५.५ टक्के एवढी मोठी वाढ झाली आहे. बँकांच्या आर्थिक आरोग्याचा विचार करताना बँकांची अनुत्पादक कर्जे (एनपीए) हा महत्त्वाचा घटक असतो. अनुत्पादक कर्ज म्हणजे कर्जदाराने परतफेड न केल्यामुळे बँकेसाठी अनुत्पादक ठरलेले कर्ज. बँकांच्या एकूण कर्जांपैकी अनुत्पादक ठरलेल्या कर्जांचे प्रमाण १.६९ टक्क्यांवर आले आहे. अनुत्पादित कर्जासाठी केलेल्या तरतुदींचा विचार केल्यानंतर उरणारे प्रमाण ०.३३ टक्क्यांवर आले आहे. अनुत्पादक कर्जांचे प्रमाण कमी होण्याचा अर्थ बँकांची कर्जवसुली आणि कर्ज व्यवस्थापन सुधारत आहे. सरकारी बँकांनी सलग पाचव्या वर्षी नफ्यात सुधारणा नोंदवली आहे. सरकारी बँकांनी सहा महिन्यांत मिळवलेला १.०९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी नफा, ३०० लाख कोटींच्या पुढे गेलेला व्यवसाय आणि १.६९ टक्क्यांपर्यंत खाली आलेले सकल बुडीत कर्जाचे प्रमाण हे भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी सकारात्मक चित्र दर्शवणारे महत्त्वाचे टप्पे आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र असे स्पष्ट असूनही राहुल गांधींसारखा प्रकांड अर्थपंडित भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून मोदी सरकारच्या नावाने खडे फोडत असेल तर राहुल गांधींच्या बुद्धिमत्तेचा नोबेल पुरस्कार देऊनच गौरव व्हायला हवा.

- प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

अतिवेगाचे १३ बळी; राज्यात विविध अपघातांत २८ जखमी, १० गंभीर

आजचे राशिभविष्य, २४ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

थंडीच्या दिवसांत चहात तुळशीची पाने टाकताय? आधी हे वाचा! प्रत्येक तुळशीची चव नसते सारखी

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी