दृष्टिक्षेप
उत्तम जोगदंड
दुभंगलेला समाज कधीही राष्ट्र घडवू शकत नाही. म्हणून ही परिस्थिती सुधारण्यासाठी, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता ही मूल्ये पुनर्स्थापित करण्यासाठी सर्वांनी, विशेषतः सत्ताधारी पक्षाने प्रयत्न करायला हवेत.
धर्म, जात, प्रांत, भाषा, वंश अशा विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील लोकांमध्ये संविधानाने समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांसोबत लोकशाही, धर्मनिरपेक्षता ही मूल्येही रुजविली. परिणामी ‘विविधतेतून एकता’ हे सार्थ बिरुद आपण अभिमानाने मिरवू शकत होतो. परंतु १२ वर्षांपूर्वी धार्मिक विद्वेषाच्या आधारे मतांचे ध्रुवीकरण करून हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आले. तेव्हापासून या संवैधानिक मूल्यांना सरकारच्या आशीर्वादाने पद्धतशीरपणे मूठमाती दिली जात असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. धार्मिक असहिष्णुता आणि विद्वेषाने जे भयाण स्वरूप धारण केले आहे ते पाहून देशातील संवेदनशील, शांतताप्रेमी, देशप्रेमी नागरिक अस्वस्थ झालेला आहे. हा विद्वेष धर्माच्या सीमा ओलांडून जात, भाषा, प्रांत, राजकीय निष्ठा यामध्ये झिरपला आहे. या विद्वेषाने समाजमन दुभंगले आहे. परिणामी, देशातील सामाजिक सलोखा, ऐक्य आणि एकात्मता धोक्यात येत आहे. म्हणून, त्यावर एक दृष्टिक्षेप टाकणे आणि गंभीरपणे विचार करणे आवश्यक ठरते.
विद्वेष पसरवण्यासाठी लोकांना विरोधकांची किळस येईल, भीती वाटेल, त्यांचा राग येईल असे काहीतरी बनावट नरेटीव्ह तयार करून ते लोकांच्या गळी उतरवायचे, अशी ही मोडस ऑपरेंडी आहे. याचाच एक भाग म्हणजे हिंदू धर्म (हल्ली, सनातन धर्म) धोक्यात असल्याची आवई उठवून मुसलमानांविषयी विद्वेष पसरवणे. विशेष म्हणजे सुमारे सात-आठशे वर्षे गैर-हिंदू (मुस्लिम-मोगल-ब्रिटिश) राजवटीत हा धर्म पूर्ण सुरक्षित राहिलेला आहे. हा विद्वेष आधी कुजबूज मोहिमेतून पसरवला जायचा. पण त्यांची सत्ता आल्यावर या विद्वेषी लोकांची हिंमत वाढली असून त्यांचा भेसूर चेहरा वेळोवेळी उघडपणे समोर येत आहे. त्याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याने गरब्याच्या बाबतीत काढलेला फतवा. लव्ह जिहाद आणि गैर-हिंदूंचा गरब्यात प्रवेश रोखण्यासाठी, पर्यायाने सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी, गरब्यात गोमूत्रमिश्रित कुंकवाचा टिळा लावल्यावरच प्रवेश देणे, आधार कार्ड तपासणे, मंडपाच्या बाहेर ‘भगवान वराहा’चे कटआऊट लावणे, असे या फतव्याचे स्वरूप आहे.
वास्तविक गेल्या काही वर्षांमध्ये गरबा हा फक्त गुजरात्यांचा एक धार्मिक उत्सव राहिला नसून त्यास कॉस्मोपोलिटन, व्यापारी स्वरूप प्राप्त झाल्याने विविध जाती-धर्मांचे लोक त्यात सहभागी होत असत. तेव्हा सनातन धर्म कधीही धोक्यात आला नव्हता. परंतु हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आल्यापासून मात्र मुसलमानांच्या गरब्यात येण्याने सनातन धर्म धोक्यात येत असल्याचा साक्षात्कार धर्मरक्षकांना झालेला दिसतो आहे. त्यातून गैर-हिंदूंना गरब्यापासून दूर ठेवण्याचे खूळ पुढे आले असले तरी लव्ह जिहाद किंवा भगवान वराह कटआऊट हे प्रकार फक्त मुसलमानांना लक्ष्य करणारे, त्यांच्याविषयी विद्वेष व्यक्त करणारे आहेत हे सांगायला तज्ज्ञांची गरज नाही. कारण मुसलमान लोक डुकरास अपवित्र मानतात, म्हणून ते ‘भगवान वराह’ दिसताच गरबा मंडपापासून दूर पळतील अशा यांच्या भाबड्या आणि सोयीस्कर समजावर कोणीही सुज्ञ माणूस विश्वास ठेवणार नाही.
चिंताजनक बाब म्हणजे ‘अहिंसा परमो धर्म’ हे तत्त्व पाळणाऱ्या आणि जगातील सर्वात अहिंसक धर्म म्हणून मानल्या गेलेल्या जैन (गैर-हिंदू) धर्माचे एक मुनी नीलेश चंद्र यांनी यात उडी घेतली असून, गरब्यामध्ये इतर धर्माचा कुणी दिसला, तर तलवार उपसा… त्याला तिथेच झोडा... आणि मातेला बळी दिला असे समजा, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सनातन धर्मरक्षक, मुसलमानांना (खरे तर जैनांसकट अन्य धर्मीयांना) गरब्यापासून निदान दूर तरी ठेवतात. पण हे जैन मुनी मात्र थेट त्यांच्या कत्तलीचीच भाषा करताहेत, हे अत्यंत धक्कादायक असून धार्मिक विद्वेषाने किती भयावह पातळी गाठली आहे हे दर्शविणारे आहे.
तिकडे गुजरातच्या कच्छ, महीसागर आणि आणंद जिल्ह्यांमध्ये तर अनुसूचित जातीच्या लोकांनाही गरब्यात प्रवेश नाकारण्यात आल्याच्या, ते गरब्याला आले म्हणून त्यांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. अनुसूचित जातीचे लोक धर्माने हिंदूच असल्याने त्यांनी गरब्यात प्रवेश केल्यामुळे सनातन धर्म धोक्यात यायचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु, इथेही अनुसूचित जातींच्या लोकांविषयी असलेला पराकोटीचा विद्वेषच दिसून येत आहे. साहिल वाकोडे या आयआयटी विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर हा जातीय विद्वेष उफाळून वर आला होता.
आज परिस्थिती अशी आहे की हा विद्वेष सर्वत्र दिसत आहे. पुण्यातील जुने खोले बाई प्रकरण असो, उत्तर प्रदेशातील इटावा येथे यादवांनी पूजा केली म्हणून त्यांना मारहाण करून शेंडी कापण्याचे प्रकरण असो, हा जाती आधारित विद्वेष सर्वत्र वाढत आहे. मराठा विरुद्ध धनगर विरुद्ध ओबीसी यांच्यातील वाद पराकोटीला पोहोचले आहेत. उपवर्गीकरणावरून मातंग विरुद्ध बौद्ध-महार यांच्यातील द्वंद्वाने ओंगळवाणे स्वरूप धारण केले आहे. एकदा विद्वेष करायचे ठरवले की त्यासाठी समोरच्याला प्रचंड राग येईल अशी अत्यंत खालच्या पातळीवरील भाषा त्याच्याविषयी किंवा त्याच्या नेत्यांविषयी वापरणे आलेच. त्याबाबतीत सर्वत्र चढाओढ लागलेली दिसत आहे.
राजकीय क्षेत्राबद्दल तर बोलायलाच नको. आपला राजकीय विरोधक म्हणजे आपला शत्रू हे नरेटीव्ह वापरून सत्ताधारी पक्षाने आणि त्यांच्या पितृ-संघटनेने आपल्या अनुयायांमध्ये विरोधकांविषयी एवढा विद्वेष पेरलेला आहे की विरोधकांनी रास्त टीका केल्यावरही त्यांना देशद्रोही ठरवले जाते. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी राजकीय मुद्द्यांचा वापर न करता त्यांच्या विषयी तिरस्कार निर्माण व्हावा म्हणून ते कसे मुस्लिम-हितैषी आहेत, ते कसे हिंदूविरोधी आहेत, त्यांनी देश कसा खड्ड्यात घातला याच्या कहाण्या रचल्या जातात. नेहरू हे मुसलमान होते असे ठसवण्यासाठी त्यांची नकली वंशावळ निर्माण केली जाते. महिलांचे चारित्र्यहनन हा तर हुकूमी एक्काच बनलेला आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्या नेहा सिंग राठोर या लोकगायिकेचे एका प्रमुख टीव्ही चॅनेलने खोटी बातमी प्रसारित करून केलेले चारित्र्यहनन आणि नंतर मागितलेली माफी हे प्रकरण अगदी ताजे आहे. सोनिया गांधी यांच्याविषयी देशाच्या जबाबदार नेतृत्वाने काढलेले घृणास्पद उद्गार याची साक्ष देतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जातीत जन्मले होते म्हणून त्यांचा आणि संविधानाचा तिरस्कार केला जातो. जेन-झीविषयीचा विद्वेष तर सरकारच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या उक्ती आणि कृतीतून ठळकपणे जाणवतो. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनासोबत झुरळ दहन करण्याची संकल्पना याची पुष्टी करते. विरोधकांना अर्बन नक्षल, दिमागी नक्षल अशी लेबले लावून शक्य तेवढा तिरस्कार केला जात आहे. हा विद्वेष लोकांमध्ये एवढा घट्ट रुतून बसला आहे की विरोधकाच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त केला जातो. विरोधी विचाराच्या राज्यातील, अन्य जाती-धर्मातील महिलेवर अत्याचार झाल्यास मौन बाळगले जाते. एवढेच नाही, तर असा अत्याचार करणाऱ्यांचा सन्मान केला जातो, महत्त्वाचे पद दिले जाते.
हे अत्यंत गंभीर असून देशाच्या ऐक्याला, एकात्मतेला, सामाजिक सलोख्याला तडा देणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “जर आपण एक राष्ट्र म्हणून टिकून राहू इच्छित असू, तर आपण आपल्यात सामाजिक आणि आर्थिक समता आणली पाहिजे. जातीयतेमुळे दुभंगलेला समाज कधीही एक मजबूत देश बनवू शकत नाही.” सरदार वल्लभभाई पटेल यांनाही भविष्याचा अंदाज आला असावा म्हणून की काय, ते म्हणाले होते, “आपल्यात अंतर्गत मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु जेव्हा देशाच्या अखंडतेचा प्रश्न येतो, तेव्हा आपण सर्व एक असले पाहिजे. कारण विभाजित झालेले राष्ट्र गुलामगिरीच्या खाईत लोटले जाते.”
दुभंगलेला समाज कधीही राष्ट्र घडवू शकत नाही. म्हणून ही परिस्थिती सुधारण्यासाठी, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता ही मूल्ये पुनर्स्थापित करण्यासाठी सर्वांनी, विशेषतः सत्ताधारी पक्षाने आणि त्यांच्या पितृसंघटनेने पक्षहितापेक्षा देशहिताला प्राधान्य देऊन हे देशावरचे संकट दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी व्यक्त केलेले मत प्रत्यक्षात येऊ नये यासाठी ठोस प्रयत्न केले पाहिजेत.
uttamjogdand@gmail.com