मुलुख मैदान
रविकिरण देशमुख
महाराष्ट्राला अनेक क्रांतीकारक, समाजसुधारक, साहित्य व संस्कृती मेरूमणी, आदर्शवत सामाजिक-राजकीय नेते-कार्यकर्ते यांचा वारसा लाभलेला आहे. त्या वारशाचे प्रतिबिंब आताच्या आरशात शोधणारे निराशेच्या गर्तेत जाऊ नयेत याची काळजी घ्यावी लागेल.
हल्ली राजकीय पायवाटेवरील निष्ठा कमालीच्या निसरड्या झाल्या आहेत. कोण कोणाला बोलले, भेटले, गुफ्तगू केले याच्या ब्रेकिंग न्यूज होतात. राजकारण प्रोफेशनल म्हणजेच कमालीचे व्यावसायिक झालेय असे म्हणावे तर कार्यकर्ते, समर्थक तितकेच संवेदनशील किंबहुना असहिष्णू दिसू लागले आहेत. याचेच प्रत्यंतर काही दिवसांपूर्वी आले. चकचकीत कार्पोरेट स्वरूप आलेल्या भाजपातले एक वजनदार व्यक्तिमत्त्व मोहित कंबोज यांच्या कन्येच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला अनेक बडे नेते हजर होते. कंबोज यांनी व्यक्तिशः निमंत्रण दिल्याशिवाय तर तिथे कोणी जाणे अपेक्षित नव्हते. तिथे विरोधी पक्षातील काही नेत्यांच्या उपस्थितीवरून प्रचंड काहूर माजले व नव्या चर्चेला तोंड फुटले.
शिवसेनेत २०२२ मध्ये फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी - मविआचे सरकार पडले. त्याआधी २०१९ मध्ये मविआचे सरकार आल्यापासूनच त्यांचे समर्थक आणि भाजपा यांच्यात समाजमाध्यमांवर शब्दबंबाळ युद्ध सुरू झाले होतेच. पण २०२२ मध्ये फूटीर शिवसेना व भाजपाचे सरकार आल्यानंतर मविआ, विशेषतः ठाकरे यांच्या शिवसैनिकांत आणि सत्ताधारी शिवसेना-भाजपा समर्थकांत प्रचंड विखारी असे वातावरण तयार झाले. ठाकरे आणि त्यांचे मराठीप्रेम, राज्याप्रतीची निष्ठा यावर शंका उपस्थित करणाऱ्या शेलक्या शब्दातील शेरेबाजीने समाजमाध्यमांत घनघोर संघर्ष सुरू झाला. त्याला उत्तर म्हणून अमराठी अजेंडा, महाराष्ट्राचे महत्त्व कमी करणारे निर्णय यावरून प्रतिहल्ले चढविले जाऊ लागले.
ते असे काही वाढत गेले की कोणी कोणासाठी काय शब्द वापरावेत, कोणत्या भाषेत उत्तर द्यावे, समाजमाध्यमांचा कसा वापर करावा याला घरबंद उरला नाही. राजकीय सभ्यतेचा भरदुपारी लिलाव झाला. पूर्वी कोणा राजकीय नेत्यावर टीका-टिप्पणी करायची झाली तर त्यांचे वय, अनुभव आणि राजकारणातील वजन हे पाहून समोरून तितक्याच तोलामोलाचे नेते टीका-टिप्पणी करत. ही मर्यादा कालबाह्य ठरली. इतकेच काय की संसद अथवा विधिमंडळातील टीका-टिप्पणीला समाजमाध्यमांतून उत्तरे दिली जाऊ लागली. जे पूर्वी केवळ संसद अथवा विधिमंडळापुरते मर्यादित राहत असे.
एखादा नवशिका कार्यकर्ताही शेलक्या शब्दांत ज्येष्ठांचा समाचार घेताना दिसू लागला. त्यामुळे राजकीय आब, संस्कृती, परस्परविषयक आदर यांना मुठमाती मिळाली. बड्या नेत्यांची उंची समाजमाध्यमांतून खुजी दाखविणे कौशल्य मानले जाऊ लागले. अशी लढाई लढणारे हे योद्धे कोण होते? यात दोन प्रकार दिसून आले. एखाद्या नेत्याच्या वा पक्षाच्या प्रती व्यक्तिगत निष्ठा असलेला कार्यकर्ता, संघटक पहिल्या वर्गवारीत दिसू लागला. दुसऱ्या वर्गवारीत आला तो त्या त्या पक्षाने अथवा नेत्याने खास कामगिरीसाठी तयार केलेल्या वॉर रूमचा सदस्य. राजकीय विरोधकाला कच्चासुद्धा सोडायचा नाही ही खुणगाठ बाळगून त्याच्यावर हल्ला चढविणे हे गेल्या ५-७ वर्षातील महाराष्ट्राचे प्राक्तन. यात अपवाद शोधण्यासाठीही विचार करावा लागतो इतकी राजकीय सरमिसळ झाली. आपापल्या विरोधकांना शेलक्या शेरेबाजीतून अतिशय वाईट पध्दतीने हिणविणारा, कसलाही पायपोस न बाळगता अवमूल्यन करून समोरच्याची प्रतीमा वाट्टेल त्या पद्धतीने छिन्न-विछिन्न करणे म्हणजेच राजकीय ताकद उभी करणे असे मानले जाऊ लागले.
पूर्वी राजकीय लढाई निवडणुकीच्या मैदानात लढली जात असे. तिचे स्वरूप राजकीय विचारधारेपुरते सिमीत असे. व्यक्तिमत्वावरून शेरेबाजी, शेलकी विशेषणे टाळली जात. गल्लीबोळातली दोन टोळ्यांमधली भाषा टाळली जात असे. तसेच शक्यतो व्यक्तिगत संबंध खराब होणार नाहीत याची काळजी घेतली जाई. जनहिताच्या प्रश्नांवर मात्र कठोर भूमिका घेतली जात असे व ती समोरच्या बाजूलाही मान्य होत असे. तेवढा समंजसपणा शिल्लक होता. तसेच राजकारण सर्वसामान्य लोकांसाठीच केले जाते ही जाणीव प्रबळ होती. लोकांच्या प्रश्नांवरील मोर्चे, आंदोलने व विधिमंडळात सत्तापक्ष आणि विरोधीपक्ष यात जुगलबंदी रंगत असे. हे स्वरूप कमालीचे बदलत गेले.
पूर्वी एखाद्या नेत्याला पक्ष बदलण्याचा आग्रह होई तेव्हा तो म्हणत असे की, माझ्या कार्यकर्त्यांशी मला चर्चा करू द्या. ते जर सोबत राहिले नाहीत तर माझी मतदारसंघात अडचण होईल. निवडणुकीत माझे काम कोणी करणार नाही. पण आता राजकारणाकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची पद्धत निर्माण झाली आहे. त्यात गुंतवणूक व परतावा याचा विचार सुरू झाला आहे. ‘विकासनिधी’ उपलब्ध होईल अशी कामे सुरू राहतील अशा स्थानी नेता असला पाहिजे असे समर्थकांना वाटू लागले. कार्यकर्ते कोणकोणती कामे सांगतात, अधिकाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या करून घेतात याची नोंद ठेवली जाऊ लागली. कामांचा कोटा ठरू लागला. अशा व्यावसायिकपणातून राजकीय लढाई सामाजिक मर्यादा पाळणारी राहील हा भाबडा आशावाद झाला. कोणासोबत राहिलो तर आपले राजकीय भवितव्य सुरक्षित राहिल हा एक वर्ग तर दुसऱ्या बाजूला त्या पक्षाच्या वा नेत्यासाठी समाजमाध्यमांवर लढणारा समर्थक यांची प्रतीस्पर्धी पक्षांसोबतची लढाई वरचेवर अधिकच भीषण झाली.
शिवसेना-उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी-शप यांच्यासाठी लढा देणारे एका वेगळ्या वर्गवारीत गणता येतील. समोरची राजकीय आघाडी म्हणजेच महायुती आपल्या नेत्यांवर कडवट हल्ला चढविते म्हणजे तो मराठी भाषा, संस्कृती, महाराष्ट्राभिमान यावरील हल्ला आहे. त्याला डिवचणारा आपला कट्टर शत्रू आहे या भूमिकेतून या तीन पक्षांचे समर्थक समाजमाध्यमांतील लढाई प्राणप्रणाने लढू लागले. तेव्हा आम्ही ज्यांच्याशी दोन हात करतो त्यांच्याशी आमच्या पक्षांतील नेत्यांचे वर्तन तसेच असले पाहिजे अशी अपेक्षा निर्माण झाली. आपल्या नेत्यांवर होणारे प्रखर हल्ले आपण झेलतो, त्याला उत्तर देतो. ते हल्ले करणाऱ्या, करवणाऱ्यांशी आपल्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध सहन होणार नाहीत, असा अविर्भाव निर्माण झाला.
याला जबाबदार कोण हा फार मोठा प्रश्न आहे. भावनिक मुद्द्यांवर कार्यकर्ते व समर्थकांना सतत चेतवत ठेवणारे पण पडद्याआड विरोधकाशी संबंध जपणारे नेते की नेत्यांवर अंधपणे विश्वास ठेवून लढणारे समर्थक, हा फरक कसा करायचा यात बरेच उत्तर सामावले आहे. नेत्यांचे जाहीर राजकीय वर्तन आणि त्यांच्या व्यक्तिगत राजकीय आवडी-निवडी यातल्या फरकाबाबत कार्यकर्ते वा समर्थक विचारणा विचारतीलच. ते लोकांना समजावे म्हणून बाहेर येईलच असे नाही.
बाहेरून हे पाहणारांना व पुरेसे समाधानकारक उत्तर न सापडणारांना बदलत्या राजकारणाचे अर्थ शोधावे लागतील. राजकारण ही केवळ विचारांची लढाई उरलेली नाही. तसेच त्याचे स्वरूप १०० टक्के व्यावसायिक झाले आहे. सत्ताप्राप्ती हे आणि हेच सर्वांचे अंतिम उद्दिष्ट आहे. वार्षिक सात-आठ लाख कोटींची उलाढाल असलेली, विपुल साधन-संपत्ती असलेली एक महाकाय राज्यव्यवस्था आपल्या बाजूने कशी कार्यरत ठेवायची यासाठीचा घनघोर संघर्ष म्हणजेच आजचे राजकारण हे वास्तव पचवावे लागेल.
एकीकडे राज्यावरचे सार्वजनिक कर्ज दरवर्षी सुमारे लाखभर कोटींनी वाढत असताना दुसरीकडे दर निवडणुकीत उमेदवारांच्या वैयक्तिक संपत्ती व मालमत्तांचे डोळे दिपविणारे वाढते आकडे, याची सांगड कशी घालायची याचा विचार राजकारणाबाबत कमालीचे संवेदनशील असणारांनी करायचा आहे. महाराष्ट्राला अनेक क्रांतीकारक, समाजसुधारक, साहित्य व संस्कृती मेरूमणी, आदर्शवत सामाजिक-राजकीय नेते-कार्यकर्ते यांचा वारसा लाभलेला आहे. त्या वारशाचे प्रतिबिंब आताच्या आरश्यात शोधणारे निराशेच्या गर्तेत जाऊ नयेत याची काळजी घ्यावी लागेल.
ravikiran1001@gmail.com